नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई : अखेर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव आघाडीवर असल्याने नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

बुधवारी नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर हालचालींना वेग आल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा ट्विस्ट आला आहे. विधानसभा अध्यक्षपद तिन्ही पक्षांचं होतं आता ते खुलं झालं आहे. आता विधानसभा अध्यक्षपदावर पुन्हा चर्चा होणार आहे, असं शरद पवार म्हणाले.

जर नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्ष पदासाठी कोण? हा सवाल उपस्थित होत आहे. जर पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तर विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये संग्राम थोपटे, सुरेश वरपूडकर आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे.