21 फेब्रुवारीला नवी मुंबईत सायक्लॉथॉन

नवी मुंबई :  पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जाणीव जागृती करीत लोकसहभागावर भर देण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान सुरु करण्यात आले आहे. नवी मुंबई महानगरपालिका विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवित आहे. या अनुषंगाने नागरिकांनी इंधनावरील वाहनाचा वापर कमी करून पर्यावरणशील वाहनाचा वापर करावा याकरिता माझी वसुंधरा अभियानांतर्गत रविवार, दि.21 फेब्रुवारी 2021 रोजी नवी मुंबई सायक्लॉथॉन 2021 चे आयोजन करण्यात येत आहे.

यावर्षी प्रथमत:च नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवी मुंबई सायक्लॉथॉन 2021 आयोजन करण्यात येत आहे. नवी मुंबईचा क्विन नेकलेस मानल्या जाणा-या पामबीच रोडवर 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.00 वाजता नवी मुंबई सायक्लॉथॉन 2021 ची सुरूवात महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या प्रवेशव्दाराजवळून होणार असून वाशीच्या दिशेने मोराज सर्कल, सानपाडा इथपर्यंत जाऊन पुन्हा महानगरपालिका मुख्यालय प्रवेशव्दारासमोर सांगता होणार आहे.

11 वर्षावरील नागरिकांसाठी सायक्लोथॉनमध्ये सहभाग खुला असून यामध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍या व्यक्तींनी https://forms.gle/GHZv1-CGXax-repj7  या संकेतस्थळावर नोंदणी करणे गरजेचे आहे. यात सहभागी होणार्‍या प्रत्येक व्यक्तीला माझी वसुंधरा अभियानाचे आकर्षक टी-शर्ट व कॅप पालिकच्या वतीने देण्यात येणार आहे. तरी नोंदणी झालेल्या व्यक्तींनी 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.00 वाजता पालिका मुख्यालयासमोरील प्रारंभ स्थळाठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे.