कोरोनाबाधित रुग्ण संख्येत घट

रूग्णदुपटीचा कालावधी 730 दिवस ; सुरक्षेच्या त्रिसूत्रीचे पालन महत्वाचे

नवी मुंबई ः डिसेंबर महिन्यात दोन आकड्यावर आलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत जानेवारी महिन्यातही तशीच घट राहिली असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे दिसून येत आहे. 16 जानेवारीपासून कोव्हीड 19 लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्यकर्मींच्या लसीकरणासही सुरूवात करण्यात आलेली आहे. तथापि असे असले तरी कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नसून मास्क, सुरक्षित अंतर, हात धुणे अशा कोव्हीड सुरक्षा नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याविषयी जनजागृती व उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई अशाप्रकारची अंमलबजावणी सुरूच आहे.  

 सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असला तरी चाचण्यांची संख्या मात्र कमी करण्यात आलेली नसून रेल्वे स्टेशन्सवरही तपासणी केद्रे सुरू आहेत. जानेवारी महिन्यातही 53723 टेस्ट्स करण्यात आलेल्या आहेत. या चाचण्यांमध्ये 2007 नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले असून एकूण चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी रेट 3.73 % इतका कमी आहे. रूग्णदुपटीच्या कालावधीतही लक्षणीय वाढ झालेली असून 30 नोव्हेंबरपर्यंत 263  व 31 डिसेंबरपर्यंत 624 दिवसांवर पोहचलेला रूग्णदुपटीचा कालावधी 31 जानेवारीपर्यंत 730 दिवस (दोन वर्षे) इतका झालेला आहे. कोरोना वाढीचा वेग कमी असला तरी जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला लसीकरण केले जात नाही तोपर्यंत सुरक्षेच्या त्रिसूत्रीचे पालन हीच बचावाची सर्वात सक्षम ढाल आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 31 जानेवारी पर्यंत एकूण 53009 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून त्यापैकी 51121 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत व 1086 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. नवी मुंबईतील कोरोनामुक्त होण्याचे 96.43% हे प्रमाण आणि मृत्यूदराचे 2.04% हे प्रमाण इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत चांगले आहे. 

7 दिवस एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही
जानेवारी महिन्यात आणखी एक समाधानाची बाब म्हणजे 12 जानेवारी रोजी एकाही कोरोना बाधिताच्या मृत्यूची नोंद झालेली नसून त्यानंतरही 17,18,23,25,27,30 जानेवारी अशा एकूण 7 दिवशी एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही व मृत्यूचे प्रमाणही कमी झालेले आहे.
802 इतकेच अ‍ॅक्टिव्ह रूग्ण 
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्याही आता कमी झालेली असून 31 जानेवारी रोजी 802 (1.51%) इतकेच कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत अ‍ॅक्टिव्ह आहेत. 31 डिसेंबरच्या तुलनेत (891 रूग्ण, 1.74%) प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे. 
आरोग्य सुविधा वाढीवर भर
नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सुरूवातीपासूनच कोरोना बाधितांवर योग्य उपचार होण्यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली. कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य सुविधा वाढीवर भर देण्यात आला. कोरोना बाधितांसाठी आवश्यकतेनुसार ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व आयसीयू बेड्सचे योग्य नियोजन करण्यात आले. 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यापूर्वी उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांत तिपटीने वाढ करण्यात आली. तसेच ऑक्टोबरपासून रूग्णसंख्या कमी होत चालल्याने महानगरपालिकेच्या 10 कोव्हीड केअर सेंटरमध्ये व 2 डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये रूग्ण दाखल करणे तात्पुरत्या स्वरूपात थांबविण्यात आले. तथापि गरज भासली तर केवळ 2 दिवसांत केंद्रे पुन्हा कार्यान्वित करता येऊ शकतील अशा प्रकारचे नियोजन केले आहे.
9703 आरोग्यकर्मींना लसीकरण 
कोव्हीड 19 प्रतिबंधात्मक लसीकरणाची प्रक्रियाही 16 जानेवारीपासून सुरू करण्यात आलेली असून पहिल्या टप्प्यात खाजगी व महापालिका डॉक्टर्स आणि इतर आरोग्यकर्मी कोव्हीड योध्यांच्या लसीकरणाला सुरूवात झालेली आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत 9703 आरोग्यकर्मींना लसीकरण करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे 2 फेब्रुवारीपासून दुस-या टप्प्यामध्ये असलेल्या पोलीस, सुरक्षा, स्वच्छता अशाप्रकारे अग्रभागी असणार्‍ंया कोव्हीड योध्यांच्या लसीकरणासही सुरूवात झालेली असून अशा 742 कोव्हीड योध्यांचे लसीकरण झालेले आहे.