जमिनीचा मालकी हक्क प्रकल्पग्रस्तांना द्यावा

आ. गणेश नाईक यांची सिडकोकडे मागणी

नवी मुंबई ः आमदार गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी आणि नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्याबरोबर एक महत्त्वाची उच्चस्तरीय संयुक्त बैठक शुक्रवारी सिडको भवन येथे पार पडली. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली सर्व प्रकारची बांधकामे नियमित करून जमिनीची मालकी प्रकल्पग्रस्तांना द्यावी अशी महत्त्वाची मागणी आ.गणेश नाईक यांनी केली.

प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली सर्व प्रकारची बांधकामे नियमित करून जमिनीचा मालकी हक्क प्रकल्पग्रस्तांना द्यावा अशी महत्त्वाची मागणी यावेळी करण्यात आली. सिडकोकडून नवी मुंबई महापालिकेला देय सार्वजनिक सुविधा भूखंडांचे हस्तांतरण लवकरात लवकर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. नवी मुंबई महापालिकेने तयार केलेला विकास आराखडा लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याचे बैठकीत ठरले. सिडको आणि एमआयडीसीच्या जागांवरील झोपडपट्ट्यांचा विकास एसआरएच्या माध्यमातून सरकारी यंत्रणांनी करावा, प्रकल्पग्रस्तांसाठी नोकर्‍यांमध्ये 25 टक्के आरक्षण ठेवावे आणि ठाणे-बेलापूर पट्ट्यातील विद्यार्थ्यांना सिडकोकडून देण्यात येणारी सध्या बंद असलेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावी. सिडकोसाठी सेवा बजावलेल्या आणि आणि परिश्रम घेतलेल्या सिडकोच्या सर्व सुरुवातीपासूनच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना कॅशलेस मेडिकल स्कीम लागू करावी, घणसोली ऐरोली या थांबलेल्या पाम बीच मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी सिडकोने महापालिकेला निधी द्यावा, विविध नोडमध्ये सार्वजनिक सुविधांसाठी आवश्यक सुविधा भूखंडांचे हस्तांतरण सिडकोने महापालिकेला करावे अशा महत्त्वाच्या मागण्या लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी या बैठकीत केल्या. या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी या प्रसंगी दिले.