उरणच्या जलकन्येची ‘इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ’ मध्ये नोंद

वृद्राक्षी टेमकरने केले 24 कि.मी. सागरी अंतर पोहून पार

उरण ः उरणची जलकन्या वृद्राक्षी टेमकर या 9 वर्षीय मुलीने तब्बल 24 कि.मी. सागरी अंतर पोहून पार करत विक्रम केला होता. यानंतर जिल्हाभरातून तिचे कौतुक होत आहे. तिच्या या धाडसी प्रयत्नाची नोंद इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेत तिला सन्मानितही केले आहे.

मूळची अलिबाग शहाबाज येथील वृद्राक्षी मनोहर टेमकर सध्या उरण मध्ये राहत आहे. जानेवारी 2020 मध्ये रेवस ते गेटवे ऑफ इंडिया हे 24 कि.मी. सागरी अंतर पोहून जाण्याचा यशस्वी प्रयत्न वृद्राक्षीने केला होता. हे अंतर तिने 8 तास 10 मिनिटांत पोहून पार केले होते. अनेक अडचणींवर मात करत तिने हा विक्रम केला होता. या विक्रमाची नोंद आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेतली आहे. या संस्थेने तिला प्रमाणपत्र तसेच मेडल देऊन सन्मानित केले आहे. सदरचे प्रमाणपत्र पत्रकार विरेश मोडखरकर, तिचे कोच हितेश भोईर आणि किशोर पाटील यांच्या हस्ते वृद्राक्षीला देण्यात आले. यावेळी आपल्या स्वप्नांची पूर्तता वृद्राक्षीने केली असल्याची भावना तिचे वडील मनोहर टेमकर यांनी व्यक्त केली.