स्वच्छता संदेशांनी सजतेय कॉर्पोरेट वॉल

नवी मुंबई ः ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ च्या अनुषंगाने विविध माध्यमांतून स्वच्छतेचा जागर करण्यात येत असून कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्च शिक्षित नागरिकांपर्यंत स्वच्छतेचे महत्व पोहचावे याकरिता कॉर्पोरेट वॉलची आगळी वेगळी संकल्पना राबविली जात आहे. 

प्रायोगिक स्वरुपात ऐरोली येथील माईंड स्पेस व महापे येथील मिलेनियम बिझनेस पार्क याठिकाणी हाताने नंबर वनची खूण दर्शविणारा मोठा फलक उभारण्यात आला असून त्यावर नागरिकांनी आपला स्वच्छता संदेश लिहून स्वाक्षरी करण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. यामधील चांगले स्वच्छता संदेश नोंदवून घेतले जात असून त्या नागरिकांना स्वच्छता विषयक सवयीच्या ‘21 दिवस चॅलेंज’ उपक्रमाची माहिती देऊन त्यामध्ये सहभागी होण्याकरिता प्रोत्साहीत करण्यात येत आहे. तसेच या नागरिकांना स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सिटीझन फिडबॅक अंतर्गत विचारले जाणारे संभाव्य प्रश्न विचारून त्यांची जास्तीत जास्त योग्य उत्तरे देणार्‍या नागरिकांना आकर्षक गिफ्ट व्हाऊचर देण्यात येत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी त्याचे ओला, सुका व घरगुती घातक अशाप्रकारे वर्गीकरण केले जाणे, हा कचरा वेगवेगळा गोळा करणे तसेच त्यातील ओल्या कचर्‍यावर घरगुती खत टोपली वापरून त्याचे खतात रूपांतर करणे याविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. कोणतीही सवय लागण्यासाठी 21 दिवस सातत्याने ती गोष्ट करत रहावी असे मानले जात असल्याने याबाबत महानगरपालिकेने 21 दिवस स्वच्छता चॅलेंज घोषित केले असून त्यामध्येही जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे याकरिता सीएसआर निधीतून आकर्षक पारितोषिकेही जाहीर करण्यात आलेली आहेत. तरी नवी मुंबईकर नागरिकांनी यावर्षी देशात पहिल्या क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.