पाण्याची काटकसर करण्याची गरज- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

न्हावा शेवा पाणीपुरवठा टप्पा तीन योजनेचे भुमिपूजन

पनवेल : भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतील तरीही पिण्याचे पाणी आपण गावागावात घेऊन जाऊ शकलो नाही हे दुर्दैव आहे. पिण्याच्या पाण्याची सोय आपण आता नाही केली तर भविष्यात गंभीर समस्या निर्माण होईल. पाण्याची काटकसर करण्याची गरज आहे, म्हणून वेळेत नव्हे तर वेळेआधी हा प्रकल्प पूर्ण करा. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, अशा शब्दांत आश्वस्त करतानाच रायगडच नव्हे तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या न्हावा शेवा टप्पा तीन पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

सोमवारी पनवेल येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या न्हावा शेवा टप्पा तीन पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री आता करोनाचे निर्बंध शिथील होईपर्यंत कोणत्याही सार्वजनिक वा जाहीर कार्यक्रमात थेट सहभागी होणार नाहीत. कोरोना विषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी आयोजकांना विशेष धन्यवाद दिले. रविवारी मी नागरिकांना कोरोनाबाबत सतर्कता बाळगण्याचे सांगत गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. मात्र नागरिकांच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची योजना असल्याने मी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांचा काळ लोटला आहे तरी अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्याची खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. एकीकडे माणूस चंद्रावर पाणी सापडते का ? याबाबत संशोधन करीत आहे. मात्र यापेक्षा आपण ज्या जमिनीवर राहतो तेथील लोकांना मुबलक पाणी उपलब्ध कसे होईल याकरिता प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. रायगड जिल्ह्यात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. पिण्याचा पाण्याची व्यवस्था आपण केली नाही, तर भविष्यात गंभीर समस्या निर्माण होतील, असे मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडले. भविष्यात पाण्यासाठी देशात युद्ध निर्माण होतील. पाण्याचे वाद देशावरून राज्यात, राज्यातून जिल्ह्यात व त्यांनतर गावोगावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने पाणी हेच जीवन असल्याचे लक्षात घेऊन त्यानुसार नियोजन करण्याची आवश्यकता आहे. याकरिता पाण्याची काटकसर करण्याची गरज आहे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. 

अशी असेल योजना
न्हावा शेवा टप्पा-3 पाणीपुरवठा योजनेमुळे सिडको, जेएनपीटी, पनवेल महानगरपालिका, एमएमआरडीए आदी प्राधिकरणांना मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. या योजनेअंतर्गत 559 मिमी ते 1950 मिमी व्यासाची व एकूण 36.11 किलोमीटर लांबीची पोलादी जलवाहिनी टाकण्यात येत आहे. कळंबोली ते रोहिंजन दरम्यान पाणीपुरवठा व्यवस्था नसलेल्या भागात 9.60 किलोमीटर लांबीची नव्याने जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. जलशुद्धीकरण केंद्रातून वाया जाणार्‍या पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. योजना पूर्ण करण्यासाठी 30 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यांनतर संबंधित कंत्राटदाराकडूनच एक वर्ष या प्रकल्पाची देखरेख केली जाणार आहे.