मालमत्ता कर अभय योजनेला मुदतवाढ

दंडात्मक रक्कमेवर 15 मार्चपर्यंत 75% आणि 16 ते 31 मार्चपर्यंत 50% सवलत

नवी मुंबई ः कोव्हीड काळात लॉकडाऊनमुळे नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले हे लक्षात घेऊन नवी मुंबईकर नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 15 डिसेंबर 2020 ते 15 फेब्रुवारी 2021 या कालावधीत मालमत्ता कर अभय योजना जाहीर करण्यात आली होती व या योजनेस 1 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दंडात्मक रक्कमेवर 15 मार्चपर्यंत 75% आणि 16 ते 31 मार्चपर्यंत 50% सवलत देण्यात येणार आहे. 

मालमत्ताकर अभय योजनेला 1 मार्चमार्चंत मुदतवाढ दिल्यानंतरही आणखी काही काळ मुदतवाढ दिल्यास दंडात्मक रक्कमेवरील सवलतीचा लाभ घेता येईल अशी विनंती नागरिक, व्यापारी, उद्योजक अशा विविध घटकांच्या माध्यमातून आयुक्तांकडे करण्यात येत होती. या विनंती, सूचनांचा विचार करून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अभय योजनेस अंतिम मुदतवाढ देताना त्यामध्ये दोन भाग केले असून मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात म्हणजे 15 मार्चपर्यंत मालमत्ताकराच्या दंडात्मक रक्कमेवर आधीप्रमाणे 75% सूट तशीच ठेवलेली आहे. तथापि त्यानंतर 16 मार्च ते 31 मार्च या कालावधीत दंडात्मक रक्कम भरावयाची असल्यास त्यावर 50% इतकीच सूट मिळेल असे जाहीर केले आहे. त्यामुळे मालमत्ताकर थकबाकीदारांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात 15 मार्चपर्यंत मालमत्ताकराची थकबाकी अधिक 25% दंडात्मक रक्कम भरून 75% इतक्या मोठ्या प्रमाणावर दंडात्मक रक्कमेवरील सवलतीचा लाभ घ्यावा. आणि त्या कालावधीत रक्कम भरणा करणे शक्य होत नसल्यास 16 मार्च ते 31 मार्च या कालावधीत रक्कम भरून 50% इतक्या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

  • अभय योजनेअंतर्गत 1 मार्च 2021 पर्यंत 112 कोटी 32 लक्ष इतकी रक्कम प्रत्यक्ष जमा झालेली आहे. 
  • नागरिकांना 60 कोटी 10 लक्ष रक्कमेपेक्षा अधिक रक्कमेची सूट मिळालेली आहे. 
  • थकबाकीची एकूण 172 कोटी 42 लक्ष इतकी रक्कम कमी झालेली आहे.
  • मालमत्ताकरापोटी सन 2020-2021 या वर्षात 1 एप्रिल 2020 ते 1 मार्च 2021 पर्यंत रु. 440 कोटी इतकी रक्कम जमा झालेली आहे.