खाद्यतेल, डाळींची शंभरी पार

नवी मुंबई ः पेट्रोल, डिझेल, गॅसच्या भाववाढीनंतर खाद्यतेल, डाळींच्या किमतीने शंभरी पार केली आहे. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक गणित बिघडले आहे. प्रत्येक वस्तूमागे 30 ते 50 रुपयांपर्यंत वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसत आहे. महागाई विरोधात नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

कोरोनाच्या टाळेबंदीनंतर किराणा मालाच्या दरात चढ-उतार होत होता. परंतु गेल्या महिन्यापासून खाद्यतेलासह डाळींच्या किमतीने शंभरी पार केली आहे. सद्य:स्थितीत मूगडाळ 101 रुपयांनी खरेदी करावी लागत आहे, तर उडीद दाळ 114 रुपयांवर गेली आहे. खाद्यतेलात लीटरमागे 40 रुपयांची भाववाढ झाली आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडलेय. त्यात काहींच्या नोकर्‍या गेल्यात, तर काहीजण नोकरीच्या शोधात आहेत. त्यात महागाईच्या झळा बसत असल्याने रहिवाशी पूर्णपणे हतबल झाले आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅसवाढ झाली. आता किराणामालात भाववाढ झाल्याने पोट भरावे तरी कशाने असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गॅस महागल्याने गृहिणी चुलीवर स्वयंपाक करत आहेत. कामावर जाताना गाडी घरी लावून बस तसेच खासगी वाहनांचा आधार घेतला जात आहे. डाळीने शंभरी पार केली असली तरी त्याकरिता पर्याय उरला नसल्याने रहिवाशांना किराणा माल खरेदी करावाच लागत आहे.  मागील वर्षीच्या  आणि आताच्या किमतीत 30 ते  50 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे भल्याभल्यांचे अंदाज चुकले आहेत.