कोपरखैरणे-विक्रोळी मार्ग व कोस्टल रोडला मंजुरी द्या

आमदार गणेश नाईक यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी

मुंबई ः शहराच्या आणि नागरिकांच्या सुविधेसाठी पालिकेने ट्रान्सपोर्ट मोबिलिटी अंतर्गत प्रस्तावित केलेल्या कोपरखैरणे- विक्रोळी मार्ग तसेच वाशी, ऐरोली एलिव्हेटेड कोस्टल रोडला मंजुरी देण्याची मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. या प्रकल्पांना मंजुरी मिळाल्यास वाशीतून शहरात प्रवेश न करता वाहनचालकांना विक्रोळी व ठाणे येथे जाणे शक्य होणार असल्याचे आ. नाईक यांनी यावेळी सांगितले. 

गेली अनेक वर्ष कोपरखैरणेतून विक्रोळीला जाणार्‍या मार्गाची चर्चा नवी मुंबईत असून त्याला अजूनपर्यंत शासनाची मंजुरी न मिळाल्याने मुर्तरुप आलेले नाही. त्याचबरोबर नवी मुंबई महापालिकेने वाशी येथील टोल नाक्याजवळून कांदळवनाच्या जंगलातून कोस्टल रोडच्या धर्तीवर वाशी ते ऐरोली एलिव्हेटेड मार्ग बनवण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएला दिला आहे. या रस्त्यामुळे वाहनचालकांना वाशीत प्रवेश न करता थेट या रिंग रोडच्या माध्यमातून  कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली येथे थेट जाता येणार आहे. या रस्त्यांमुळे शहरातील वाहतुक रहदारी कमी होणार असल्याने महापालिका यासाठी आग्रही आहे. सुमारे 700 कोटी रुपये त्यासाठी खर्च येणार असून हा मार्ग एमएमआरडीएने पुर्ण करावा अशी मागणी नवी मुंबई महानगरपालिकेने केली होती. भविष्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्र नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडले जाणार असल्याने त्याचा ताण शहरातील मार्गावर येऊ नये म्हणून या दोन्ही मार्गांचे महत्व अधोरेखित आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गांनी नवी मुंबई जोडली गेल्यास शहरातील अंतर्गत वाहतूक सुरळित होऊन वाहनधारकांना शहरात न येता आपल्या इप्सित स्थळी जाणे शक्य होणार आहे. या रस्त्यांचे महत्व लक्षात घेऊन आ. गणेश नाईक यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या रस्त्यांना तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी केली आहे.