Breaking News
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे विशेष बैठकीत निर्देश
नवी मुंबई ः मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत असून या कोरोनाच्या संभाव्य दुसर्या लाटेचा वेग बर्याच अंशी जास्त आहे. त्यादृष्टीने खबरदारीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लक्ष दिले जात आहे. सोमवारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोव्हीड 19 शी संबंधित अधिकार्यांची तातडीने बैठक घेत कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांविषयी मुद्देनिहाय सविस्तर चर्चा केली व आदेश निर्गमित केले.
सध्या कोव्हीडच्या वाढत्या प्रादुर्भावाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन ‘मिशन ब्रेक द चेन’ ची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ट्रेस, टेस्ट आणि ट्रिटमेट या त्रिसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीवर अधिक भर देण्याचे सूचित करीत आयुक्तांनी टेस्टींग वाढीसाठी सर्व नागरी आरोग्य केंद्रात कोव्हीड टेस्टींग सेंटर तसेच फ्ल्यू ओपीडी सुरू करण्याचे निर्देशित केले. त्याचप्रमाणे 5 पेक्षा जास्त रूग्ण आढळतात अशा सोसायट्या व त्याच्या आसपासच्या सोसायट्यांमध्ये तसेच मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळताहेत अशा वसाहतींमध्ये टेस्टींग करण्यासाठी ‘कोव्हीड टेस्टींग मोबाईल व्हॅन’ पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करून त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. रूग्णसेवेची उपलब्धता वाढविण्याप्रमाणेच रूग्णवाहिकांचे नियोजन, रूग्णालयातील बेड्स उपलब्धतेचा डॅशबोर्ड अद्ययावतीकरण, गर्दीवर नियंत्रण ठेवणेसाठीच्या उपाययोजना, कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्या नागरिकांवर वॉच ठेवण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष दक्षता पथकांची कार्यवाही अशा विविध बाबींबाबत या बैठकीमध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai