नवी मुंबईत तूर्तास पाणीकपात नाही

मोरबेत ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा ; पाणी जपून वापरण्याचे पालिकेचे आवाहन

नवी मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महापालिकेच्या मोरबे धरणात पुढील पाच महिने म्हणजेच ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांना सध्या तरी कोणत्याही प्रकारच्या पाणीकपातीला सामोरे जावे लागणार नाही. असे असले तरी जागतिक जल दिनाच्या मुहूर्तावर नवी मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

स्वतःचे धरण असलेली नवी मुंबई महापालिका ही राज्यातील एकमेव महापालिका आहे. मोरबे धरणातून शहरवासीयांना चोवीस तास पाणीपुरवठा केला जातो. असे असले तरी मान्सूनचा अंदाज बांधता येत नसल्याने दरवर्षी मार्च महिन्यात पाण्याचे नियोजन केले जाते. गरज पडल्यास पाणीकपातीचा पर्याय निवडला जातो. परंतु या वर्षी तशी गरज पडणार नाही. कारण मोरबे धरणात 60 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाणी किमान पाच महिने पुरेल, असा विश्वास महापालिकेच्या संबंधित विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. असे असले तरी देशाच्या अनेक भागांत आजही पाण्याचे दुर्भिक्ष आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईकरांना पाण्याचा अपव्यय टाळून आवश्यक तेव्हढेच पाणी वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. मोरबेची पाणीसाठवण क्षमता 88 मीटर इतकी आहे. म्हणजेच मोरबेत एकूण 190.89 दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. सध्या मोरबे धरणात 114.90 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न पडल्याने धरण पूर्णत: भरले नाही. त्यामुळे या वर्षी पाणीकपातीची शक्यता वर्तविली जात होती. मात्र धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा असल्याने तूर्तास पाणीकपातीची कोणतीही शक्यता नसल्याचे महापालिकेच्या संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.