अपघातग्रस्तांना मदत करणार्‍यांचा अपघात

पनवेलजवळ विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू; दोन जण गंभीर जखमी

पनवेल : सोमवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पनवेलजवळ झालेल्या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर पनवेलच्या अष्टविनायक आणि एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुशांत मोहिते (वय 26 वर्षे) आणि प्रथमेश बहिरा (वय 24 वर्षे) अशी मृतांची नावं असून ते पनवेल इथले रहिवासी होते. 

मुंबईच्या दिशेने जाणार्‍या एका  स्विफ्ट कारला कंटेंनरने मागून धडक दिली होती. या अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष  सुशांत मोहिते (26), पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिले  आणि  इतर दोन जण अपघातस्थळी पोहोचले. मात्र, त्यावेळी भरधाव टेम्पोने त्यांच्या थांबलेल्या कारला मागून जोराची धडक दिली.ते मदत करत असताना पाठिमागून येणार्‍या टेम्पोने त्यांना चिरडले. हा अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला.

या विचित्र अपघातात मर्सिडीज कारमधील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. याशिवाय स्विफ्ट कारमधील एक जण जखमी झाला. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने नगरसेवक तेजस कांडपिले अपघातातून बालंबाल बचावले. दरम्यान, या अपघातात स्विफ्ट कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातात पनवेल रुग्णवाहिका असोसिएशनचे 26 वर्षीय अध्यक्ष सुशांत मोहिते आणि 24 वर्षीय प्रथमेश बहिरा यांना प्राण गमवावे लागले. ते दोघेही पनवेलचे रहिवासी होते. तर हर्षद खुदकर हे जखमी झाले आहेत. नगरसेवक तेजस कांडपिलेही किरकोळ जखमी झाले आहेत. मदत करणार्‍या दोघा देवदुतांना अपघातात मृत्यू आल्याने पनवेल परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.