शहरांच्या वर्गीकरणानुसार ठरणार कोरोना उपचाराचे दर

खासगी रुग्णालयांना चाप लावण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : कोरोनाच्या उपचारासाठी अवास्तव दर लावणार्‍या खाजगी रुग्णालयांना राज्य शासनाने चाप लावला आहे. रुग्णालयांचा दर शहराच्या वर्गीकरणानुुसार ठरवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंबंधीच्या अधिसूचनेला मंजुरी दिली आहे. खासगी रुग्णालयातील उपचारांचे दर निश्‍चित करण्यात आले असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असून जास्त दर आकारणार्‍या रूग्णालयांच्या लुटीला चाप बसणार आहे. 

आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत, यात निश्चित दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत. या अधिसूचनेची काटेकोर आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना निर्देश देण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. खाजगी रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांवर उपचारासाठी 80 टक्के खाटांसाठी शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार व उर्वरित 20 टक्के खाटांसाठी खाजगी रुग्णालयांनी निश्चित केलेल्या दरानुसार दर आकारणी करण्याबाबतची अधिसूचना काल संपली. आज त्यास मुदतवाढ देताना त्यात शहरांच्या वर्गीकरणानुसार सुधारणा करण्यात आली आहे.

यापुर्वीच्या अधिसुचनेत उपचारांचे दर हे मोठ्या शहरातील रुग्णालये व अति दुर्गम भागातील रुग्णालये यासाठी एकच होते. शहरांच्या वर्गीकरणामुळे आता उपचारांच्या खर्चात मोठा दिलासा मिळणार आहे. विमा कंपन्या आणि विविध प्रकारचे भत्ते देताना ज्याप्रमाणे शहरांचे वर्गीकरण केले जाते. त्याच निकषावर वर्गीकरण आणि संबंधित उपचारांचे दर निश्चित केल्याने, विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांवरील उपचारांचा खर्च तुलनेने कमी होणार आहेच. दरांसाठी शहरांच्या दर्जानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. अ, ब, क अशा गटात शहरे व भागांची विभागणी केली आहे त्यामुळे आता शहरी व ग्रामीण भाग यामध्ये उपचारांचा दर वेगवेगळा असेल व पर्यायाने ग्रामीण भागात तुलनेने कमी खर्चात उपचार शक्य होतील.

 • जनरल वॉर्डचे दर (प्रती दिवस)
 • अ वर्ग शहरांसाठी 4 हजार रूपये
 • ब वर्ग शहरांसाठी 3 हजार रूपये
 • क वर्ग शहरांसाठी 2 हजार 400 रूपये

(यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च व जेवण याचा समावेश. कोविड चाचणीचा खर्च निश्चित केलेल्या दराप्रमाणे द्यावा लागेल. केवळ मोठ्या चाचण्या व तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळली आहेत.)

फक्त आयसीयू आणि विलगीकरणाचे दर 

 • अ वर्ग शहरांसाठी 7 हजार 500 रूपये
 • ब वर्ग शहरांसाठी 5 हजार 500 रूपये
 • क वर्ग शहरांसाठी 4 हजार 400 रूपये
 • व्हेंटिलेटर आयसीयू विलगीकरणाचे दर 
 • अ वर्ग शहरांसाठी 9 हजार रूपये
 • ब वर्ग शहरांसाठी 9 हजार 700 रूपये
 • क वर्ग शहरांसाठी 5 हजार 400 रूपये

अ वर्ग शहरांमध्ये मुंबई महानगर क्षेत्रांचा समावेश असणार आहे. पुणे, पुणे महानगर क्षेत्र आणि नागपूर या शहरांचा देखील समावेश आहे. तर यामध्ये भिवंडी, वसई-विरार हे क्षेत्र वगळण्यात आले आहेत.  ब वर्ग शहरांमध्ये नीशिक औरंगाबाद, अमरावती, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, सांगली, मालेगाव, नांदेड या शहरांचा देखील समावेश आहे. क वर्ग भगात अ आणि ब वर्ग शहरांव्यतिरिक्त सर्व शहरांचा समावेश असणार आहे.