पालिका देणार विद्यार्थ्यांना अनलिमिटेड नेट पॅक

बॅक खात्यावर जमा करणार 1 हजार रूपये

नवी मुंबई ः कोव्हिडच्या पार्श्‍वभुमीवर शाळा प्रत्यक्ष सुरु नसून ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरु आहे. काही पालकांना आपल्या मुलांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्याकरिता मोबाईलमध्ये आवश्यक असलेला नेटचा अनलिमिटेड डाटा पॅक टाकणे आर्थिक स्थितीमुळे शक्य होत नाही. त्यामुळे महापालिका शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सहामाही करिता नेटच्या अनलिमिटेड डाटा पॅकसाठी 1000 रूपये विद्यार्थ्याच्या अकाऊंटमध्ये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोव्हीडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर आगामी 2021-22 या शैक्षणिक वर्षात किमान पहिल्या सहामाहीत शाळा प्रत्यक्ष वर्गात न भरवता विद्यमान ऑनलाईन शिक्षण पध्दत सुरू राहील. या कालावधीत विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध होण्याकरिता पुढाकार घेऊन नाविन्यपूर्ण गोष्टी केल्या जात आहेत. यामध्ये निदर्शनास आलेली एक महत्वाची बाब म्हणजे काही पालकांना आपल्या मुलांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्याकरिता मोबाईलमध्ये आवश्यक असलेला नेटचा अनलिमिटेड डाटा पॅक टाकणे आर्थिक स्थितीमुळे शक्य होत नाही. त्यामुळे महापालिका शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणात कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सहामाही करिता नेटच्या अनलिमिटेड डाटा पॅकसाठी 1000 रूपये विद्यार्थ्याच्या अकाऊंटमध्ये जमा करण्याचा निर्णय घेण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे ज्या मुलांच्या पालकांकडे मोबाईल नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नही करण्यात येत आहे. यावर्षीही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासोबतच कृती पुस्तिकाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सदर कृतीपुस्तिकांचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येईल. दर 15 दिवसांनी संबंधित शिक्षक त्या विद्यार्थ्यांच्या घरी भेट देऊन त्याने अभ्यास केलेली कृतीपुस्तिका त्याच्याकडून घेतील व पुढील अभ्यासाची कृतीपुस्तिका त्याला उपलब्ध करून देतील. ज्यायोगे त्या विद्यार्थ्याच्या अभ्यासाचे मूल्यमापनही करता येणे शक्य होईल. याशिवाय ऑनलाईन वर्गात काही विद्यार्थ्याकडून मोठ्याने पाठ वाचन करून घेणे, जेणकरून योग्य वाचनाची व उच्चारांची सवय होईल आणि समुहात वाचनामुळे व्यक्तिमत्व विकास होईल. त्याचप्रमाणे विविधांगी उपक्रमशील शिक्षण पध्दती राबविणे अशा नाविन्यपूर्ण संकल्पना साकारण्यात येणार असून यामधून आनंददायी व सर्वांगीण विकास करणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यावर भर दिला जाणार आहे. ऑनलाईन शिक्षण प्रक्रियेत उत्तम काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थांचेही सहकार्य यामध्ये घेतले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला नेट डेटा पॅकची रक्कम देऊन आर्थिक आधार देणार्‍या नवी मुंबई महानगरपालिकेच्या या विद्यार्थीहिताय निर्णयामुळे 35 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलासा मिळणार आहे.