आरोग्य सुविधा निर्मिती कार्यवाही गतीमान करा

पालिका आयुक्तांचे आढावा बैठकीत  निर्देश

नवी मुंबई ः संभाव्य तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आत्तापासूनच जागरूक रहात कोव्हीड आरोग्य सुविधा व अनुषांगिक बाबींच्या पूर्ततेकडे काटेकोर लक्ष देणे गरजेचे आहे असे मत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले. तसेच आरोग्य सुविधा निर्मिती कार्यवाही गतीमान करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले.  

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सध्याच्या आरोग्य सुविधांमध्ये वाढ करण्याकडे लक्ष दिले जात आहे व याबाबत सातत्याने आढावा घेतला जात आहे. आजच्या आढावा बैठकीमध्ये तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक सुविधा निर्मिती जलद करण्यावर भर देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. सध्या कोव्हीडची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरताना दिसत असली तरी ही लाट उच्च पातळीवर असताना एका दिवसातील अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 12 हजार पर्यंत पोहचल्याचे निदर्शनास आले होते. इतर देशांतील तिसर्‍या लाटेचा अभ्यास करता त्यामध्ये साधारणत: दुपटीने वाढ होईल अशी  आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्स वाढीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यातही संभाव्य तिसर्‍या लाटेत कोव्हीड बाधितांमध्ये मुलांची संख्या अधिक असेल अशी व्यक्त केली जाणारी शक्यता लक्षात घेऊन तशा प्रकारच्या पिडियाट्रिक आरोग्य सुविधा निर्मितीचे नियोजन करण्यात आले आहे. साधारणत: सर्वसाधारण बेड्समध्ये 3000, ऑक्सिजन बेड्समध्ये 1500, आयसीयू बेड्समध्ये 500 यापैकी 200 व्हेंटिलेटर्स व 200 बायपॅपची वाढ करण्याच्या दृष्टीने स्थापत्य, विद्युत सुविधा तसेच आवश्यक उपकरणे, साहित्य यांची निविदा प्रक्रिया तातडीने करण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले.   

आरोग्य सुविधा निर्मितीप्रमाणेच त्या प्रमाणात रूग्णवाहिका उपलब्धता असणे गरजेचे आहे याकरिता रूग्णवाहिकांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करून तो तातडीने अंमलात आणण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या. सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाच्या माध्यमातून टेस्टींगची केंद्रे वाढविण्यावर भर देण्यात आला असून यापैकी काही मनुष्यबळ वापरून कोव्हीड लसीकरणालाही वेग देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उपलब्ध मनुष्यबळाला आयसीयू वॉर्ड्समधील वैद्यकीय उपचारांचे प्रशिक्षण देऊन तिसर्‍या लाटेसाठी त्यांना सज्ज करण्यात येत आहे. त्याचाही आढावा आयुक्तांनी घेतला. कोव्हीडसाठी सुविधांमध्ये वाढ केली जात असताना नॉन कोव्हीड सुविधांकडेही विशेषत्वाने प्रसूतीसंबंधित सुविधांकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी आरोग्य विभागास दिले.