केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या पोलिस महानिरीक्षकपदी रणदिप दत्ता

नवी मुंबई : केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या पश्चिम विभागाचे पोलिस महानिरीक्षक म्हणून रणदिप दत्ता यांनी मावळते पोलिस महानिरीक्षक संजय लाटकर यांच्याकडून नुकताच पदभार स्विकारला. रणदिप दत्ता हे 1986 च्या बॅचचे राजपत्रित अधिकारी असून त्यांनी यापूर्वी मणिपूर, नागालँड, इम्फाळ येथे यशस्वीरिता आपला कार्यकाळ पुर्ण केला असून त्यांच्या कार्याचा अनुभव आता पश्चिम विभागास उपयुक्त ठरणार आहे. तर संजय लाटकर यांची नियुक्त झारखंड पोलिस दलात पोलिस महानिरीक्षक म्हणून करण्यात आली आहे.   

नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर परिसरात पश्चिम विभागाचे मुख्य कार्यालय असून या पश्चिम विभागीय क्षेत्रात महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांसहित दादरा-नगर हवेली आणि दिव-दमण या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे.  

विशेष म्हणजे महाराष्ट्र व गोवा राज्यात होणाऱया विविध निवडणुकांदरम्यान केंद्रीय व राज्य सशस्त्र दलाचे जवान तैनात करण्याकरिता पश्चिम विभागीय महानिरीक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. याशिवाय महाराष्ट्रातील गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागातील नक्षलींचे उच्छाटन करण्यासाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दल कटिबद्ध असल्याची माहिती महानिरीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर रणदिप दत्ता यांनी दिली.