कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या खोट्या जाहीरातीबाबत सावधान

नवी मुंबई ः महानगरपालिकेमध्ये गार्ड, सुपरवायझर, स्क्रिनींग ऑफीसर, क्लार्क, अकाऊंटन्ट, वॉर्ड बॉय, हाऊसकिपींग अशी विविध संवर्गातील पदे करार पध्दतीने भरणेबाबतची खोटी जाहीरात व्हॉ़ट्स अ‍ॅप आणि इतर सोशल माध्यमांवर प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर जाहिरातीकरिता नवी मुंबई महानगरपालिकेचे खोटे लेटरहेड तयार करून जाहिरात बनविण्यात आलेली आहे.

वास्तविकत: अशी कोणतीही जाहिरात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत प्रसिध्द करण्यात आलेली नाही. तरी नागरिकांनी अशा प्रकारच्या दिशाभूल करणार्‍या जाहिरातींना बळी पडू नये व प्रतिसाद देऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे. याविषयी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येत असून पालिकेविषयी कोणत्याही अधिकृत माहितीसाठी नागरिकांनी महानगरपालिकेच्या वेबसाईटवर तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक, ट्विटर पेजला भेट द्यावी असे आवाहन केले आहे.