पालिकेच्या शाळा होणार इंग्रजी!
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 27, 2026
- 20
‘शिक्षण रूपांतर धोरण 2026’ धोरण प्रस्तावित
नवी मुंबई ः महापालिकेने ‘शिक्षण रूपांतर धोरण 2026’ प्रस्तावित केले आहे. यामध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून नवी मुंबई पालिकेच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरु करण्यात येणार आहे. गरिबांच्या मुलांनाही इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेता यावे या उद्देशाने सभागृहनेते सागर नाईक यांनी हा ठराव मांडला आहे. या ठरावावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी गटाने याचे स्वागत केले असले तरी विरोधी पक्षांकडून मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या महत्वपुर्ण धोरणावर विस्तृत चर्चेसाठी हा प्रस्ताव पुढील सभेत घेण्यात येणार आहे.
पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे असलेला कल पाहता आणि भविष्यातील आधुनिक शिक्षणाशी जोडले जाण्याकरीता गरीबांनाही इंग्रजीतून शिक्षणाची संधी मिळावी यासाठी ‘शिक्षण रूपांतर धोरण 2026’ प्रस्तावित करण्यात आले आहे. महापालिका शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचा टप्प्याटप्प्याने विस्तार हा या धोरणाचा केंद्रबिंदू आहे. केवळ श्रीमंतांपुरतेच मर्यादित न राहता गोरबगरीब विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची समान संधी मिळावी, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सागर नाईक यांनी सभागृहात स्पष्ट केले. मराठी भाषेचे स्थान अबाधित राखले जाईल आणि तिच्या संवर्धनासाठी स्वतंत्र उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले. नव्या शैक्षणिक वर्षापासूनच या धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्याचा महापालिकेचा मानस आहे. त्यानुसार नर्सरीचे प्रवेश इंग्रजी माध्यमातून होणार आहेत. हीच नर्सरीची बॅच पुढे ज्युनिअर-सिनिअर अशी दहावी पर्यंत वाढवून टप्यटप्यात इंग्रजी माध्यमाचा विस्तार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक पद्धतीतही बदल प्रस्तावित आहेत. चौथी आणि सातवी इयत्तेत बुद्धिमत्ता चाचण्या, सातवीपासूनच कौशल्याधारित शिक्षणाचा समावेश, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या आधुनिक विषयांचा अभ्यासक्रमात समावेश, क्रीडा आणि शारीरिक विकासालाही धोरणात महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.
या बदलांमुळे महापालिका शाळांची गुणवत्ता उंचावेल आणि विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाशी जोडले जाईल, अशी खात्री सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, विरोधकांनी शाळांची सध्याची स्थिती लक्षात घेऊन आधी मूलभूत सुविधा सुधारण्याची गरज व्यक्त केली आहे. इंग्रजी माध्यमाचा विस्तार करण्यापूर्वी शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण देणे आणि शाळांची गुणवत्ता उंचावणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ इंग्रजी या एका विषयासाठी मराठी माध्यमांच्या शाळांना दुय्यम स्थान देऊन इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य देणे हे उचित नाही. इंग्रजी सुधारण्यासाठी स्वतंत्र शिक्षक, स्पीकिंग कोर्स किंवा विशेष उपक्रम राबवावेत, असे तरी संपूर्ण शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याचा निर्णय घाईचा असल्याची भूमिका मनसेचे नगरसेवक अभिजीत देसाई यांनी मांडली. या आमूलाग्र बदलाच्या प्रस्तावात परिपुर्ण शिक्षकवर्ग, शासनाच्या परवानग्या, इमारतींचा व शिक्षणाचा दर्जा आणि शाळांना मिळणार प्रतिसाद अशा अनेक महत्वपुर्ण बाबी असून त्यांची पुर्तता कितपत होते यावर या धोरणाचे यश असणार आहे.
- शिक्षकांची पुर्तता कशी करणार
सद्यस्थितीत मराठी शाळेतील शिक्षकांना इंग्रजी माध्यमाच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात केवळ ज्युनियर केजीसाठी इंग्रजी माध्यम सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर वर्षागणिक एक एक वर्ग पुढे जाऊन इंग्रजी माध्यमाचा विस्तार करण्यात येणार आहे. गरज असेल तेथे शिक्षक भरती करण्यात येणार आहे. तत्पुर्वी मराठी माध्यमाच्या शिक्षकांनाच प्रशिक्षण घेऊन इंग्रजी माध्यमाचे धडे शिकवावे लागणार आहेत. त्यामुळे या शाळांमध्ये खरंच दर्जेदार शिक्षण मिळू शकेल का अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
- प्रस्तावाला मनसेचा विरोध
पालिकेच्या मराठी शाळा इंग्रजी माध्यम करण्याच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावाला मनसेने विरोध केला आहे. कोणताही अभ्यास न करता, खाजगीकरणाच्या माध्यमातून आर्थिक भ्रष्टाचार करण्यासाठी हा प्रस्ताव आणल्याचा आरोप गजानन काळे यांनी पत्रकारपरिषदेमध्ये केला. इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभुत सुविधांची वानवा असताना, शिक्षक भरती कशी करणार याचे धोरण उपलब्ध नसताना एवढी घाई का केली जाते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अट्टाहास असेलच तर ज्या शाळांची पटसंख्या 20 टक्क्यांहून कमी असेल तेथे प्रायोगिक तत्वावर इंग्रजी माध्यम सुरु करण्याची सुचना काळे यांनी केली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai