जेएनपीटीत मोबाइल एक्स-रे स्कॅनर्स सुविधा

मुंबई : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट हे भारतातील एक प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगति व बंदराच्या एकूण कार्यक्षमते मध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने जेएनपीटीने एनएसआयसीटी व एपीएमटी येथे 2 मोबाइल एक्स-रे स्कॅनर बसविले आहेत. या नवीन मोबाइल स्कॅनरचे उद्घाटन जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी व मुख्य कस्टम आयुक्त यू.निरंजन, जेएनसीएच यांनी बंदराचे भागधारक आणि व्यापार प्रतिनिधींच्या उपस्थितीत केले.

जेएनपीटीने बंदरातील जेएनपीसीटी, डीपीवर्ल्ड आणि एपीएमटी या तीन टर्मिनल्ससाठी प्रत्येकी एक असे तीन मोबाइल कंटेनर स्कॅनर्स आयपीए मार्गे खरेदी करून स्थापित केले आहेत, यासाठी एकूण 101 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या तीन स्कॅनर पैकी एक स्कॅनर 30 मार्च 2021 रोजी कार्यान्वित झाला आहे. या व्यतिरिक्त, जेएनपीटीने बीएमसीटीपीएलसाठी एक ड्राइव्ह थ्रू कंटेनर स्कॅनर सुविधा सुरू केली आहे ज्यासाठी एकूण 46.25 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सध्या या प्रकल्पाचे 75% काम पूर्ण झाले असून ते मार्च 2022 पर्यंत कार्यान्वित होईल. या नवीन मोबाइल कंटेनर स्कॅनरमुळे प्रति तास 20 कंटेनर स्कॅन केले जातील पर्यायाने बंदराच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल, ज्यायोगे आयात-निर्यात व्यापार वर्गाच्या मालाची जलद गतीने वाहतुक होण्यास मदत होईल. तसेच टर्मिनल आवारात असलेल्या कंटेनरची तपासणी करण्यास मदत होईल व यामुळे कंटेनर बंदरातून बाहेर पडण्या अगोदरच सुरक्षा यंत्रणांना योग्य ती कारवाई करता येईल. या सुविधेमुळे व्यापार वर्गाचा फायदा होणार आहे, कारण नवीन मोबाइल स्कॅनरद्वारे तपासणी झाल्यानंतर डीपीडी कंटेनर थेट बंदरातून बाहेर जाऊ शकतात. स्कॅनिंगची  प्रक्रिया वेगवान असल्याने सर्व भागधारकांची वेळ व खर्चाची बचत होणार आहे. या नवीन मोबाइल कंटेनर स्कॅनरच्या उद्घाटनाविषयी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, या नवीन मोबाइल एक्स-रे स्कॅनर सुविधेमुळे टर्मिनलच्या आवारातील कंटेनर स्कॅन करता येतील व संबंधित कंटेनर बंदरातून बाहेर पडण्याअगोदरच सुरक्षा दलांना योग्य ती कारवाई करता येईल. या स्कॅनरमुळे आमच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होण्यास व प्रत्येक टर्मिनलसाठी स्वतंत्र स्कॅनिंग सुविधा निर्माण केल्यामुळे आयातीचा ड्वेल टाइम कमी करण्यास मदत होईल. अशा प्रकारच्या उपाययोजनां केल्याने जेएनपीटीस तांत्रिकदृष्ट्या प्रगत जागतिक बंदरासमान बनविण्यास मदत होईल ज्यामुळे जगातील आघाडीच्या कंटेनर बंदरांमध्ये जेएनपीटीचे स्थान उंचावण्यास मदत होईल.