धोकादायक विद्युत पोल हलविण्यास सुरुवात

पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील सावरकर चौक ते अमरधाम स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्यालगत असणारे विद्युत पोल व विद्युत तारा धोकादायक अवस्थेत लोंबकळत आहेत. काही विद्युत पोल एकाबाजूस झुकलेले आहे, त्यामुळे जड वाहन येथून जात असताना शॉक लागण्याचे प्रकार घडत आहेत. याच रस्त्यावर नवीन कोर्ट असल्याकारणाने येथे दैनंदिन मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असते. त्यातच धोकादायक अवस्थेत असणार्‍या विद्युत पोल व विद्युत तारांमुळे मोठा आपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी देखील या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी महावितरणचे अधिकारी आणि आयुक्त यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत धोकादायक विद्युत पोल हलविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

सावरकर चौक ते अमरधाम रस्त्यावर अनेक धोकादायक विद्युत पोल आहेत. रस्त्याच्या मधोमध असलेल्या विद्युत पोलमुळे गेल्या काही दिवसात अनेक अपघात घडले आहेत. तसेच विद्युत तारा जमिनीला लोंबकळलेल्या अवस्थेत असताना टेम्पोला शॉक लागल्याची घटना घडली होती. अशा घटना पनवेल पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे ह्यांच्या निदर्शनास येताच विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड आणि जयदीप नानोटे ह्यांच्या सोबत लेखी पत्रव्यवहार करून आज धोकादायक विद्युत पोल हलविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.