अखेर वचनपूर्तीसह स्वप्नपुर्ती झाली

महागृहनिर्माण योजनेतील सिडको घरांचा ताबा देण्यास सुरुवात 

नवी मुंबई ः सिडको महागृहनिर्माण योजना 2018-19 यातील घरांचा 1 जुलैपासून ताबा देण्याचे वचन सिडकोने पाळले आहे. टप्प्याटप्प्याने फेस नुसार घरे देण्यात येणार असून गुरुवारी कळंबोलीतील लाभार्थ्यांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सदनिका सुपूर्द करण्यात आल्या. त्यामुळे सिडकोच्या वचनपुर्तीसह लाभार्थ्यांची स्वप्नपुर्ती झाली आहे. 

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सिडकोने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तळोजा येथे 2,862, खारघर येथे 684, कळंबोली येथे 324, घणसोली येथे 528 आणि द्रोणागिरी येथे 864 घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. अल्प उत्पन्न गटासाठी  तळोजा येथे 5,232, खारघर येथे 1,260, कळंबोली येथे 582, घणसोली येथे 954 आणि द्रोणागिरी येथे 1,548 घरे उपलब्ध करून देण्यात आली. सदर योजनेची संगणकीय सोडत 2 ऑक्टोबर 2018 रोजी पार पडली. 1 जुलैपासून घरांचा ताबा देण्याचे वचन सिडकोने पाळले असून त्यानुसार पहिल्यांदा कळंबोलीतील लाभार्थ्यांना सदनिकेचे वाटप करण्यात येत आहे. सदर कार्यक्रम हा सेक्टर-15, भूखंड क्र. 1 ते 9, पोलीस मुख्यालयामागे, कळंबोली, नवी मुंबई येथे मोजक्या मान्यवरांच्या आणि निवडक अर्जदारांच्या उपस्थितीत व कोविड-19 सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करून पार पडला. या प्रसंगी राजन विचारे, खासदार, ठाणे, डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांची प्रमुख उपस्थिती तर अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको यांची सन्माननीय उपस्थिती लाभली. 

या प्रसंगी बोलताना एकनाथ शिंदे यांनी हजारो कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होत आहे, ही आनंदाची बाब असून कोविड-19 च्या काळातही सिडकोतील अभियंते व अधिकार्‍यांनी घरांचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष पुरविले. केवळ घर बांधणी व विकास प्रकल्प यात मर्यादित न राहता सिडकोने कोविड काळाच्या संकट समयी शासनाच्या निर्देशानुसार विविध ठिकाणी कोविड सेंटर व रूग्णालयाची उभारणी केली हे कौतुकास्पद आहे असे प्रशंसोद्गार काढले. या प्रसंगी बोलताना डॉ. संजय मुखर्जी यांनी कोविड-19 महासाथीच्या काळात उद्भवलेल्या अडचणींवर केलेली मात तसेच अर्जदारांना भेडसावणार्‍या आर्थिक अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अर्जदारांना दिलासा देणारे निर्णय घेतल्याचा उल्लेख केला. यशस्वी अर्जदारांना सदनिका सुपूर्द करण्याचा हा क्षण वचनपूर्तीचा आनंद देणारा आहे. आजपासून यशस्वी अर्जदारांना घरांचा ताबा टप्याटप्याने देण्यात येईल असेही ते म्हणाले. 

सदर योजने अंतर्गत नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या 5 नोड्मध्ये 11 ठिकाणी घरे साकारण्यात आली. 14,838 घरांपैकी 5,262 घरे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर 9,576 घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. ही घरे 1 बीएचके (1 हॉल, 1 खोली, 1 स्वयंपाकघर, 2 स्वच्छतागृहे) प्रकारातील असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध असलेल्या घराचा चटई क्षेत्र 25.81 चौ.मी. तर अल्प उत्पन्न गटाकरिता असलेल्या घराचा चटई क्षेत्र 29.82 चौ.मी. इतका आहे. या योजनेतील गृहसंकुलांना भारती शास्त्रीय संगीतातील रागांची नावे देण्याची अभिनव कल्पनाही राबविण्यात आली.