लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार

नवी मुंबई ः मुंबईतील खार परिसरात राहणार्‍या एका 30 वर्षीय विधवा महिलेला कोल्हापुर येथे राहणार्‍या विवाहित व्यक्तीने लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वाशीतील लॉजमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. सचिन पाटील (36) असे या व्यक्तीचे नाव असून वाशी पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. 

या घटनेतील आरोपी सचिन पाटील हा कोल्हापुर येथे रहाण्यास असून तो विवाहित आहे. तसेच त्याला 3 मुले देखील आहेत. सचिन पाटील दुधाचा टँकर चालवत असल्यामुळे त्याचे कोल्हापुर येथून मुंबईत नियमित येणे जाणे असते. तर या घटनेतील पिडीत विधवा महिला खार येथे राहण्यास असून ती खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते. गत वर्षात लॉकडाऊनच्या काळात पिडीत महिला आपल्या गावी जात असताना, सचिन पाटील याने आपल्या दुधाच्या टँकरमध्ये तिला लिफ्ट दिली होती. त्यामुळे त्यांच्यात चांगली ओळख झाली होती. त्यानंतर त्यांची मोबाईल फोनवरुन चॅटींग सुरु झाली होती. याच कालावधीत सचिन पाटील याने पिडीत महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यासोबत प्रेमसंबध निर्माण केले. त्यानंतर त्याने पिडीत महिलेला डिसेंबर 2020 मध्ये वाशीतील सपना लॉज तसेच नेरुळ मधील साई प्रतिक लॉजमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केले होते. मात्र त्यानंतर सचिन पाटील याने पिडीत महिलेला टाळायला सुरुवात करुन तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. सचिन पाटीलने अशा पद्धतीने फसवणुक केल्याचे लक्षात आल्यानंतर पिडीत महिलेने वाशी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सचिन पाटील विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

7 वर्षीय मुलीवर अत्याचार

नवी मुंबई ः वाशी सेक्टर-9 भागात राहणार्‍या एका व्यक्तीने त्याच भागातील एका 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकिस आली आहे. अर्जुन दळबा इचके (31) असे या आरोपीचे नाव असून वाशी पोलिसांनी त्याच्यावर बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. 

आरोपी अर्जुन इचके हा व पिडीत मुलगी हे एकाच परिसरात राहण्यास असून त्याचे पिडीत मुलीसोबत चांगली ओळख असल्यामुळे त्याचे या मुलीच्या घरी नेहमी येणे-जाणे होते. दरम्यान, पिडीत मुलीच्या आईला मोबाईल विकत घ्यायचा होता. त्यामुळे गत 9 जुन रोजी आरोपी अर्जुन इचके हा पिडीत मुलीच्या आईसोबत मोबाईल खरेदी करण्यासाठी दुकानात गेला होता. मात्र मोबाईल खरेदी करण्यासाठी पिडीत मुलीच्या आईला चेकची आवश्यकता असल्याने आरोपी अर्जुन इचके हा चेक घेण्यासाठी पिडीत मुलीच्या घरी गेला होता. दरम्यान, घरामध्ये पिडीत मुलगी एकटीच असल्याने आरोपी अर्जुन इचके याने संधी साधुन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले होते. ही बाब पिडीत मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर तीने सदर घटना आपल्या पतीला सांगितली. त्यानंतर त्यांनी शेजार्‍यांसोबत सल्ला मसलत करुन मंगळवारी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अर्जुन इचके याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.