कचरा वर्गीकरण होणार 4 प्रकारे
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 09, 2026
- 29
ओला, सुका, घरगुती घातक, सॅनिटरी पद्धतीने संकलन; मोठया आस्थापनांना आवारातच करायची प्रक्रीया
नवी मुंबई ः ‘घनकचरा व्यवस्थापन नियम 2026’ हे दि. 1 एप्रिल 2026 पासून संपूर्ण देशभरात लागू झाले असून देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष कॅटेगरीत समाविष्ट नवी मुंबई शहर त्यांच्या अंमलबजावणीसाठी सज्ज झाले आहे. आता नव्या नियमानुसार कचऱ्याचे वर्गीकरण चार प्रकारात होणार असून त्यासाठी चार वेगवेगळ्या रंगाचे डबेे उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्याप्रमाणे अधिक कचरा निर्मिती करणाऱ्या मोठया सोसायटट्या, आस्थापनायांनी आपल्या आवारातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करणारे प्रकल्प राबवायचा आहे.
‘घनकचरा व्यवस्थापन नियम 2026’ च्या अमंलबजावणीसाठी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष माहितीपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्तांनी सर्व विभागातील स्वच्छता स्थितीचा बारकाईने आढावा घेतला. यामध्ये प्रत्येक विभागात किती स्वच्छताकर्मी कार्यरत आहेत, त्यावर किती पर्यवेक्षक आहेत, त्यांच्या स्वच्छतेच्या कामाच्या वेळा काय आहेत व प्रत्येक संबंधिताची जबाबदारी काय आहे याविषयी सविस्तर माहिती घेण्यात आली. ‘घनकचरा व्यवस्थापन नियम 2026’ नुसार कचऱ्याचे वर्गीकरण चार प्रकारे होणे गरजेचे असून ओला कचरा व सुका कचरा यासाठी अनुक्रमे हिरव्या व निळया रंगाचे मोठे डबे तसेच घरगुती घातक व सॅनिटरी कचऱ्यासाठी अनुक्रमे काळया व गुलाबी रंगाचे लहान डबे लवकरात लवकर उपलब्ध करुन दयावेत असेही आयुक्तांमार्फत निर्देश देण्यात आले. अशा चार प्रकारच्या कचऱ्याचे निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण होणे आवश्यक असून सर्व नागरिकांना याची माहिती असावी यादृष्टीने त्याची व्यापक प्रसिध्दी करावी असे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. या कचऱ्याचे संकलनही वेगवेगळे करुन त्याची वाहतूक स्वतंत्ररित्या करणे आवश्यक असून या बाबीकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. वर्गीकरण न केलेला कचरा उचलून घेतला जाणार नाही याची कल्पना संबंधित सोसायटी व संस्था यांना दयावी असेही सूचित करण्यात आले.
नव्या नियमानुसार 20 हजार चौ. फुटापेक्षा अधिक आकाराचे इमारत क्षेत्र असलेल्या किंवा 40 हजार लि. प्रतिदिन पाण्याचा वापर असलेल्या अथवा प्रत्येक दिवशी 100 किलोहून अधिक कचरा निर्मिती करणाऱ्या मोठया गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स, मॉल्स, रुग्णालये, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, व्यावसायिक संकुले व मोठया आस्थापना यांनी आपल्या आवारातच ओल्या कचऱ्यावर प्रक्रीया करणारे प्रकल्प राबवायचे असून त्याची नोंदणी सीपीसीबी पोर्टलवर करावयाची आहे. तसेच त्यांनी 30 जूनपर्यंत वार्षिक विववरणपत्र दाखल करावयाचे आहे. या बाबींचे पालन न केल्यास दंड व कायदेशीर कारवाई होऊ शकते. या सर्व गोष्टींची जाणीव संबंधितांना करुन दयावी व त्यांच्याकडून याबाबतची कार्यवाही करुन घ्यावी असेही निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले.
रस्ते, पदपथ, दुभाजक तसेच नेहमी कचरा टाकला जातो अशा जागा यामधील दैनंदिन साफसफाईची गुणवत्ता वाढविण्यासाठी स्वच्छताकर्मींना प्रोत्साहीत करावे व स्वच्छता अधिकारी आणि निरीक्षकांनी त्यावर दररोज गांभीर्याने लक्ष्ा दयावे असे सूचित करतानाच यामध्ये निष्काळजीपणा आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले. रस्त्यावर बसणारे अनधिकृत फेरीवाले हे देखील मोठया प्रमाणात अस्वच्छता पसरवतात हे लक्षात घेऊन विभाग अधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब आणून देऊन त्यांच्यावरही कारवाई करावी असेही निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले.
- आढावा घेण्याची कार्यपध्दती
स्वच्छतेविषयीची निरीक्षणे व अहवाल सादर करण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा असावी तसेच स्वच्छता अधिकारी व स्वच्छता निरीक्षक स्तरावर दैनंदिन आढावा, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त स्तरावर आठवडयातून दोनदा आढावा, अतिरिक्त आयुक्त स्तरावर साप्ताहिक आढावा आणि महापालिका आयुक्त स्तरावर प्रत्येक पंधरवडयाला आढावा घेण्याची कार्यपध्दती सुरु करावी असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. अशाच प्रकारे शौचालय व्यवस्थापनाचाही आयुक्तांनी विभागवार आढावा घेतला. - ‘टॉयलेट क्लिनिंग ॲप’
शौचालय व्यवस्थापनावर नियमित निरीक्षण व नियंत्रण राहावे याकरिता तत्परतेने ‘टॉयलेट क्लिनिंग ॲप’ बनविण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. तसेच सीबीडी बेलापूर पारसिक हिल येथील विश्वनाथ महाराज समाधी मंदीराजवळ त्याचप्रमाणे बेलापूर किल्ला येथे सिडको गेस्ट हाऊसजवळ नागरिकांच्या सुविधेसाठी शौचालय बनवावीत असेही आयुक्तांनी सूचित केले.
- ओल्या कचऱ्यामध्ये उरलेले अन्न, भाज्यांची साल, पाणी, चहापावडर अशा जैवविघटनशील कचऱ्याचा समावेश आहे.
- सुक्या कचऱ्यामध्ये कागद, पुठ्ठा, प्लास्टिकच्या वस्तू , धातू , काच अशा पुनर्वापरयोग्य साहित्याचा समावेश आहे.
- घरगुती घातक कचऱ्यामध्ये बॅटरी, औषधे, बल्ब, पेंटचे डबे, सिरींज अशा धोकादायक साहित्याचा समावेश आहे.
- सॅनिटरी कचऱ्यामध्ये सॅनिटरी पॅड, डायपर, बँडेज, आणि तत्सम स्वच्छताविषयक कचऱ्याचा समावेश आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai