मोरबे धरणात डिसेंबर अखेरपर्यंतचा जलसाठा

नवी मुंबईत 15 जुलैपासून पाणीकपातीचे संकेत

नवी मुंबई ः जुन महिन्यात पुरेसा पाऊस मोरबे धरण क्षेत्रात झालेला नसल्याने धरणाच्या पाण्याची पातळी 74 मीटरपर्यंत घसरली आहे. जुलैचा पहिला आठवडा सरल्यावरही पावसाने दडी मारल्याने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीसाठ्याचा आढावा घेतला असून 15 जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास पाणीकपातीचे संकेत शहर अभियंता संजय देसाई यांनी दिले आहेत. 

महापालिकेच्या मोरबे धरणातून संपुर्ण नवी मुंबई क्षेत्रासह पनवेलमधील सिडकोच्या वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. मोरबे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 88 मीटर आहे. आतापर्यंत धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे फक्त 42.26 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने पाणीपुरवठा विभाग चिंतेत आहे. नवी मुंबईला दररोज 430 एमएलडी पाण्याचा पुरवठा या धरणातून करण्यात येत असून असाच पाणीपुरवठा सुरु राहिल्यास डिसेंबर अखेरपर्यंत पुरेल एवढाच जलसाठा धरणात आहे. त्यामुळे पावसाने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची झोप उडवली असून शहर अभियंता संजय देसाई यांनी याबाबत पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना जाणिव करुन दिली आहे. मोरबे धरण पुर्ण क्षमतेन भरुन वाहण्यासाठी अजून 2000 मीमी पावसाची गरज धरण क्षेत्रात आहे. गेल्या वर्षी या महिन्यात असलेल्या पाणीसाठ्याएवढाच जलसाठा यंदाही धरणात आहे. मोरबे धरण क्षेत्रात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस पडतो असा गेल्या 40 वर्षांचा इतिहास असल्याने निसर्गाच्या कृपेवर पालिका अधिकार्‍यांचे लक्ष लागले आहे. आता उपलब्ध असलेला जलसाठ्याचे नियोजन करुन त्याचा पुरवठा नवी मुंबईकरांना केल्यास हा पाणीपुरवठा जुनपर्यंत होवू शकतो असे पालिका अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पडणार्‍या पावसावर अवलंबून न राहता तत्काळ नवी मुंबईत पाणीकपात लागू करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. नंतर समाधानकारक पाऊस झाल्यास पाणीकपात टाळता येऊ शकते. परंतु आजच नियोजनाची आवश्यकता असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे मत आहे. पालिका आयुक्त पाणीपुरवठा विभागाच्या या मागणीला प्रतिसाद दिल्यास ऐन पावसाळ्यात नवी मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.