अवैध वाळू उपसा करणार्‍यांवर कारवाई

पनवेल ः पनवेलमधील रोडपाली व वाघिवली येथे अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याबाबतच्या वारंवार तक्रारीनुसार पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. त्यामुळे बेकायदेशीर वाळू उत्खनन करणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

12 जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास रोडपाली, वाघिवली हद्दीत ओहोटीच्या वेळी बेकायदेशीररित्या एका बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा होत असल्याची गोपनीय तक्रार प्राप्त होताच भरती सुरू झाल्यानंतर पनवेल तहसील कार्यालयाचे पथक त्याठिकाणी बारा वाजण्याच्या सुमारास पाठवण्यात आले.सदर ठिकाणी पथकाला चार अनधिकृत बोटी दिसून आल्या. मात्र कारवाईसाठी आलेल्या कर्मचार्‍यांना पाहताच बोटीतील वाळू उपसा करणार्‍यांनी तेथून पळ काढला. परंतु त्याजागी अवैध वाळू उपसा करणार्‍या बोटी असल्याने त्या पथकामार्फत नष्ट करण्यात आल्या. सदरची कारवाई पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी मंडळ अधिकार्‍यांच्या दोन पथकांनी केली. पनवेल परिसरात अनेक ठिकाणी संधीचा फायदा घेऊन बेकायदेशीररित्या वाळुमाफिया सक्रिय झाले होते. विशेषतः रात्रीच्या वेळेला वाळू उत्खनन केले जात असल्याचे प्रकार तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीनंतर समोर आले होते. त्या अनुषंगाने तहसीलदार विजय तळेकर यांनी वाळू माफियांवर कारवाईचा बडगा उगारला असून यापूर्वीही अनेकदा वाळू उत्खनन करणार्‍यांवर कारवाई केली आहे.