रखडलेल्या नाट्यगृहासाठी नव्याने निविदा

नवी मुंबई ः वाशीत एकमेव नाट्यगृह असल्याने नवी मुंबईतील अनेक नाट्यप्रेमी रसिकांसह कलावंताचीही निराशा होत आहे. यासाठी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसाठी मध्यवर्ती ठरणार्‍या ऐरोलीमध्ये सुसज्ज असे नाट्यगृह उभारण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने सहा वर्षांपूर्वी घेतला होता. त्यासाठी सर्व सोपस्कार पार पाडून कामाला सुरुवातही झाली होती. मात्र कंत्राटदाराच्या आर्थिक अडचणींमुळे गेली पाच वर्षे हे काम रखडले आहे. आत्ता महापालिकेने या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी नव्याने निविदा मागवल्या आहेत. त्यामुळे याला कसा प्रतिसाद मिळतो यावर नाट्यगृहाचे भवितव्य ठरणार आहे. 

नवी मुंबई शहरासाठी म्हणजेच ऐरोली ते बेलापुर पट्ट्यात पालिकेचे वाशीत एकमेव विष्णुदास भावे नाट्यगृह आहे. मात्र ऐरोली आणि परिसरातील नोडमधील नाट्यप्रेमींना एकतर वाशीला किंवा ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये यावे लागते. नाट्यप्रेमींची ही अडचण ओळखून ऐरोली येथे नाट्यगृहाच्या निर्मिती करण्याचे ठरले. त्यासाठी ऐरोलीच्या सेक्टर 5मधील भूखंड क्रमांक 37 या ठिकाणी पालिकेने नाट्यगृहासाठी सिडकोकडे पाठपुरावा करून जागा मिळवली. भावे नाट्यगृहाच्या धर्तीवर अत्याधुनिक सेवा-सुविधांनी सज्ज असे नाट्यगृह ऐरोलीत उभारले जावे, यासाठी पालिकेने निविदा मागवल्या होत्या. या ठिकाणी 860 आसनक्षमतेचे प्रशस्त असे नाट्यगृह उभारले जाणार आहे. सहा वर्षांपूर्वी पालिकेने या नाट्यगृहाचे बांधकाम सुरू केले होते. मात्र तळमजल्याचे थोडे काम केल्यावर कंत्राटदाराच्या आर्थिक अडचणींमुळे हे काम रखडले. ते आजतागायत प्रलंबितच आहे. त्यामुळे महापालिकेने नव्याने या ठिकाणी दुसर्‍या कंत्राटदाराकडून काम करवून घेण्यासाठी निविदा मागवल्या, मात्र त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि वाढणारा खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने हे काम रेंगाळले आहे. नाट्यगृहाच्या उभारणीसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे.  या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी आलेल्या निविदा स्वीकारण्याचे काम सुरू आहे. नाट्यगृहाचा खर्च 70 कोटींच्या घरात गेला आहे. ही रक्कम आधीपेक्षा 24 टक्के अधिक आहे. सहा वर्षानंतर खर्चातही वाढ होणार असल्याने या कामासाठी पालिकेच्या तिरोजीवर मात्र भार पडणार आहे.

भुखंडाला तलावाचे स्वरुप 
नाट्यगृहाच्या जागेवर मोठा खड्डा झाला असून पावसाळ्यात या ठिकाणी पाणी भरते. येथे लहानसहान अपघातही होत असतात. नाट्यगृहाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून आजपर्यंत तिघांचे प्राण गेले आहेत. त्यामुळे हे काम तरी सुरू करावे किंवा हा खड्डा तरी बंदिस्त करावा, अशी मागणी ऐरोलीकर करत आहेत. सध्या सुरक्षेसाठी पालिकेने या खड्ड्याभोवती पत्रे पावले आहेत.