कोसळधारेचा मुंबईसह उपनगरांना फटका

नवी मुंबई : शनिवारपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणार्‍या कोसळधारेने अनेकांना फटका बसला असून झालेल्या दुर्घटनांमुळे अनेकांचे  जीवही गेले आहेत. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीलाही याचा फटका बसला आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी दिसून येत आहे. नवी मुंबईतही अनेक ठिकाणी वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत तर काही ठिकाणी रस्ते खचल्याच्या घटना घडल्या आहेत. नवी मुंबईत पावसात अडकलेल्या 375 जणांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे. आर्टिस्ट व्हिलेज धबधब्यात अडकलेले 200 पर्यटक, तर अडवली-भूतवलीच्या ओढ्यापलीकडे शेतकरी अडकले होते.

पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट
मुंबई आणि कोकण किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 50 ते 60 किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील. 23 तारखेस देखील संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  
रेल्वे वाहतूक विस्कळीत
हार्बर मार्गावरील लोकलही 15-20 मिनिटे उशीराने सुरु आहेत. मध्य रेल्वेला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग ते विक्रोळी दरम्यान रेल्वेरुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे ठाणे सीएसएमटी लोकल वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र पावसानं उसंत घेतल्यामुळे रेल्वे रुळावरील पाणी ओसरले. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली. सध्या मध्ये रल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरु आहे.  हार्बर, ट्रान्स हार्बर लाइनवर वाहतूक सध्या सुरु आहे.
ठाणे-बेलापुर रोडवर वाहतुक कोंडी
मुसळधार पावसाने रस्ते वाहतुक खोळंबली असून वाहतुक कोंडी झाली आहे. परिणामी चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांना तारेववची कसरत करावी लागत आहे.