नवी मुंबईतही विठू नामाचा गजर

नवी मुंबई : दरवर्षी परंपरेनुसार आषाढी एकादशीला राज्यभरातून वारकरी विविध ठिकाणांहून पायी दिंड्या पंढरपुरमध्ये दाखल होतात.  मात्र मागील वर्षी प्रमाणे यंदा कोविडच्या प्रादुर्भावामुळे शासनाने पायी वारी रद्द केल्याने वारकर्‍यांचा हिरमोड झाला होता. मात्र दरवर्षी पायी वारी करणार्‍या वारकर्‍यांनी नाराज न होता मोठ्या भक्ती भावात वारीची उणीव भरून काढत नवी मुंबईत आषाढी एकदशी साजरी करत वारी अनुभवली.

भूमिपुत्रांचे शहर असलेल्या नवी मुंबई शहराला देखील वारीचा मोठा वारसा असून गावागावातुन दरवर्षी नवी मुंबईतील वारकरी पायी वारी करीत आले आहेत. मात्र मागील वर्षी कोरोनाच्या सावटामुळे वारी रद्द झाली होती तर यंदा देखील कोरोना कायम असल्याने वारी होऊ शकत नाही. त्यामुळे पायी वारीला जाणार्‍या लाखो वारकर्‍यांचा हिरमोड झाला आहे. मात्र याची उणीव वारकर्‍यांनी भरून काढत नवी मुंबई शहरातच आषाढी एकादशी निमित्त वारी साजरी केली. कोपरखैरणे गावात शुक्रवार दिनांक 2 जुलै रोजी मोठ्या भक्ती भावात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान निमित्त गावात कोरोनाचे नियम पाळत व सुरक्षित अंतर ठेवून पायी प्रती दिंडी काढून माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा साजरा केला होता. तर मंगळवारी, 20 जुलै आषाढी एकादशी निमित्त गावात पुन्हा दिंडी काढली. तसेच यावेळी हरिपाठ, माऊलींचे रिंगण करुन साक्षात वारी अनुभवली. तसेच नवी मुंबईतील, दिवा, गोठीवली, घणसोली ,बोनकोडे,कोपरी, वाशी,नेरुळ, शिरवणे, बेलापूर आदी गावातील मंदीरात विट्ठल रखुमाई मंदिरात भक्तांनी दर्शन घेतले.