फेसबुक मैत्रीने वृद्धेला दहा लाखांचा गंडा

नवी मुंबई ः फेसबुकवरून एका अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करणे नेरूळमधील एका 70 वर्षीय वृद्धेला चांगलेच महागात पडले आहे. फेसबुकवरील या मित्राने परदेशातून मोठ्या प्रमाणात सोने व डॉलर पाठविल्याचे सांगून दिल्ली विमानतळावरून हे पार्सल मिळविण्यासाठी या वृद्धेला वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये तब्बल सव्वादहा लाख रुपये पाठविण्यास भाग पाडून तिची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. नेरूळ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

काही महिन्यांपूर्वी या वृद्धेची फेसबुकवरून डॉ. विक्टर जॉन याच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी डॉ. जॉन याने या वृद्धेच्या मोबाइलवर फोन करून तो ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक कार्यातून मदत पुरवित असल्याचे सांगितले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात डॉ. विक्टरने लंडन येथून या वृद्धेला खूप सारे सोने व डॉलर गिफ्ट म्हणून पाठवित असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याने लंडन येथून पाठविलेले गिफ्ट पार्सल दिल्ली विमानतळावर कस्टम विभागाने पकडल्याचे सांगून हे पार्सल मिळविण्यासाठी कस्टम विभागाच्या बँक खात्यात 90 हजार रुपये व एजंटच्या खात्यात दोन लाख रुपये पाठवून देण्यास सांगितले. त्यामुळे वृद्ध महिलेने पैसे पाठवून दिले. त्यानंतर एका महिलेने दिल्ली कस्टम विभागातील एजंट असल्याचे भासवून या वृद्धेशी संपर्क साधत तिच्या नावाने आलेल्या गिफ्टमधील चार लाख 80 हजार डॉलर हे रुपयांमध्ये रुपांतरित झाले असून ती रक्कम त्यांना हवी असल्यास त्यांना 80 हजार रुपये पाठविण्यास सांगितले. ही रक्कम पाठविल्यानंतर या महिलेने डिलिव्हरी चार्जेससाठी, रिझर्व्ह बँकेच्या एक्स्चेंजसाठी अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांना आणखी काही लाखांची रक्कम पाठविण्यास भाग पाडले. अशा पद्धतीने या वृद्धेकडून सव्वा दहा लाख रुपये उकळल्यानंतरदेखील त्यांना कुठलेही गिफ्ट पाठविले नाही. त्यामुळे वृद्ध महिलेने विक्टर व एजंट महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला असता, त्यांचे फोन बंद असल्याचे आढळून आले. अखेर त्यांनी नेरूळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली.