खारघर, तळोजा, कळंबोलीत पाणीटंचाई

सिडकोविरोधात नागरिकांचे आंदोलन

नवी मुंबई ः पनवेलमधील खारघर, तळोजा, कळंबोली भागात गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाई भासू लागली आहे. या भागात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी सिडकोची आहे. मात्र योग्य व्यवस्थापन करून पाणी सोडले जात नसल्याने पाणी सोसायटीपर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण झाल्यात. याबाबत सिडको दरबारी अनेक वेळा विनंती करुनही दखल घेतली जात नसल्याने अखेर रहिवाशांनी मोर्चा काढला.

सीबीडी येथील सिडको कार्यालयावर मोर्चा काढत यावेळी सिडको विरोधात घोषणाबाजी करणारे पोस्टर रहिवाशांनी फडकाविले. कृत्रिमरीत्या पाणीटंचाई निर्माण करून सिडको टँकर माफियांचे भले करीत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला. सरकारच्या नियमानुसार सिडको प्रत्येक फ्लॅटला दररोज 675 लीटर पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. तरीही मुबलक पाणी सिडको देण्यास अयशस्वी ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यासंदर्भात पाणी पुरवठ्याचे ऑडिट करण्यासाठी सिडको लवकरच एक एजन्सी नियुक्त करेल असे सांगण्यात आले.