हर घर दस्तकमध्ये 36 हजार नागरिकांचे लसीकरण
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 08, 2021
- 778
नवी मुंबई ः ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका सतर्क झाली असून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी टेस्टींगमध्ये वाढ तसेच जलद लसीकरणावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना विषाणूपासून बचावासाठी मास्क हेच सर्वात प्रभावी अस्त्र आहे हे लक्षात घेत ‘मास्क व लसीकरण नाही तर प्रवेश नाही’ ही मोहीम प्रभावीपणे राबविली जात आहे. ‘हर घर दस्तक’ अभियानाच्या माध्यमातून 36 हजार 294 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे.
सद्यस्थितीत 75 टक्के नागरिकांनी कोव्हीड लसीचे दोन्ही डोस घेतले असून उर्वरित नागरिकांपर्यंत जलदरित्या पोहचून त्यांना संपूर्ण लस संरक्षित करण्याकडे विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेने 11 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत हर घर दस्तक अभियान प्रभावीपणे राबवित अभियान कालावधीत 26,948 नागरिकांचे लसीकरण केलेले आहे. यामध्ये प्रत्येक नागरी आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात घरोघरी जाऊन ज्यांचे लसीकरण राहिले आहे त्यांना घराजवळच लसीकरण करण्यात आले. या मोहिमेचे महत्व लक्षात घेत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हे अभियान नंतरच्या कालावधीतही सुरु ठेवावे असे निर्देश आरोग्य विभागाला दिलेले असून घरापर्यंत पोहचून लसीकरण करण्याची कार्यवाही नियमित सुरु ठेवण्यात आलेली आहे. त्यानुसार नागरी आरोग्य केंद्रनिहाय तयार केलेल्या पथकांच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून 1 ते 06 डिसेंबर या कालावधीत 9346 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. अशाप्रकारे ‘हर घर दस्तक’ अभियानाच्या माध्यमातून 36 हजार 294 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर कोव्हीड टेस्टींगचे दैनंदिन 7 हजारापर्यंत असलेले प्रमाण जराही कमी न करता वाढविण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे लवकरात लवकर जास्तीत जास्त नागरिकांना लस संरक्षित करण्यावर भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने हर घर दस्तक अभियानाव्दारे केल्या जाणार्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद लाभलेला आहे.
आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार हर घर दस्तक अभियानाप्रमाणेच मार्केटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी रुग्णवाहिका उभी करून ‘लसीकरण आपल्या दारी’ ही मोहिमही अधिक प्रभावी करण्यात आली असून 1 डिसेंबर पासून सहा दिवसात 1579 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय नेरुळ, वाशी व घणसोली या 3 रेल्वे स्टेशनप्रमाणेच 1 डिसेंबरपासून कोपरखैरणे व ऐरोली या दोन रेल्वे स्टेशनवरही कोव्हीड लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली असून त्याठिकाणी आत्तापर्यंत 7 हजार 840 नागरिकांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. नवी मुंबईकर नागरिकांनी ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन मास्क मुळेच कोव्हीड पासून बचाव होऊ शकतो हे लक्षात घेऊन मास्कचा नियमित वापर करावा.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai