Breaking News
नवी मुंबई ः स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नवी मुंबई महापालिकेतर्फे विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारण्यात आली आहेत. मात्र अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालयांत अस्वच्छता पाहायला मिळत आहे. तुर्भे गावातील सेक्टर 22 येथील बजरंग बेकरी जवळ असलेले सार्वजनिक शौचालय गेल्या वर्षभरापासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच स्वच्छतागृहाबाहेर कचर्याचे ढीग साचले असून याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे स्वच्छ नवी मुंबईत ‘टॉयलेट एक दिखाव्याची कथा’ झाल्याची चर्चा सुरु आहे.
स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये सहभाग घेताना महापालिकेने शहराचा कायापालट करण्याचे ठरवले तेव्हा शहरातील शौचालयांकडे विशेष लक्ष दिले. त्यानुसार अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढवली. महत्त्वाच्या ठिकाणी तर अत्याधुनिक व स्वयंचलित ई-टॉयलेट्स उभारून पालिकेने आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरातील जुनी शौचालये पाडून नवी सार्वजनिक शौचालये उभारण्यास सुरुवात केली. त्यामुळे पालिका हद्दीतील सार्वजनिक शौचालयांची संख्या दीड हजारांच्या घरात आहे. यात महिला पुरुष आणि लहान मुलांसाठीही विशेष शौचालये उभारण्यात आली आहेत. ही सार्वजनिक शौचालये पालिकेने काही संस्थांना चालवण्यास दिली गेली आहेत. त्यामुळे नागरिकांना पैसे आकारून ती वापरता येतात. मात्र स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या आलेल्या नवी मुंबई शहरात सार्वजनिक शौचालये असली तरी अनेक शौचालयात अस्वच्छता पाहायला मिळत आहे. तुर्भे गावातील सेक्टर 22 येथील बजरंग बेकरी जवळील पालिकेचे सार्वजनिक शौचालय गेल्या वर्षभरापासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष करुन महिला वर्गाला याचा सर्वात जास्त फटका बसत आहे. तसेच स्वच्छतागृहाबाहेर कचरा टाकण्यास मनाई केली असतानाही नागरिकांकडून तेथे कचरा टाकला जात आहे. त्यामुळे तेथे कचर्याचे ढीग साचले आहेत. याकडे पालिकेचेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे नागरिकांसह पालिकेकडूनही स्वच्छ सर्वेक्षणाला हरताळ फासला जात आहे. परिणामी स्वच्छ नवी मुंबईची प्रतिमा मलिन होत असल्याने पालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस