पालिकेने लावली 25 हजार फळ झाडे

नवी मुंबई : एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साधण्यासाठी नवी मुंबई पालिकेच्या वतीने दिघा येतील वन विभागाच्या जागेवर पंचवीस हजार झाडांची लागवड नुकतीच करण्यात आली. मात्र या ठिकाणी केवळ शोभेची झाडे न लावता वड, आंबा, फणस, जांभूळ, कडुलिंब यासारख्या फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. 

सध्या सिमेंटच्या इमारतीचे जंगल वाढत आहेत. प्राणी पक्षी यांना राहायला जागा आणि खायला अन्न मिळत नसल्याने ते शहराकडे येऊ लागले आहेत. त्यामुळे आता त्यांच्यासाठी जंगल उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे दिघा टेकडीवर ही झाडे लावत असताना त्या ठिकाणी असणाार्‍या झाडांवर प्राणी, पक्षी यावेत, त्यांच्या राहण्या-खाण्याची सोय व्हावी, तिथे त्यांनी घरटी बांधावीत या अनुषंगाने त्या ठिकाणी झाडे लावण्याच्या सूचना पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केल्या होत्या. त्यापूर्वी तिथे सप्तपर्णीची झाडे लागवडीसाठी आणण्यात आली होती. मात्र आयुक्तांच्या सूचनेनंतर फळझाडांची लागवड करण्यात आली आहे.

पंचवीस हजार झाडे लावण्यासाठी पालिकेने वन विभागाच्या वन विकास महामंडळाला सांगितले होते. त्याचा खर्च पालिकेने दिला आहे. तीन वर्षांसाठी महामंडळ या झाडांचे संगोपन करणार आहे. पावसाळ्यानंतर तिथे झाडांना पाणी घालण्याचे कामही तेच करणार आहेत. शिवाय पहिल्या वर्षी लावलेली झाडे जर सुकली तर त्या जागी दुसरी झाडे लावण्याची आणि ते झाड तीन वर्ष जपण्याची जबाबदारी महामंडळावर आहे. पहिल्या वर्षीच्या लागवडीचा आणि देखभालीचा खर्च पालिका करणार आहे.