साखर, गव्हाची निर्यात वाढल्याने तेजी
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 16, 2022
- 849
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम; जगभर महागाईचा झेंडा उंच
नवी दिल्ली ः रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पुरवठा साखळी प्रभावीत झाली आहे. खाद्यपदार्थांच्या पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होताना दिसत आहे. मात्र हे सर्व वातावरण भारतीय शेतकरी आणि निर्यातदारांच्या पथ्यावर पडणारं आहे. केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार चालू वर्षात साखरेची विक्रमी निर्यात झाली आहे. त्याच प्रमाणात गव्हाचीदेखील निर्यात वाढली असल्याचं खाद्य सचिव सुधांशु पांडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, या युद्धामुळे अन्नधान्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
- 80 लाख टन साखर निर्यातीची शक्यता
सुधांशु पांडे यांच्या म्हणण्यानुसार गेल्या आर्थिक वर्षात भारताने प्रचंड प्रमाणात साखरेची निर्यात केली आहे. आर्थिक वर्ष 2020-2021 च्या तुलनेत मागील आर्थिक वर्षात आपण अधिक साखरेची निर्यात तसंच उत्पादन केलं आहे. यंदा आपण साखर निर्यातीमध्ये 80 लाख टनाचा टप्पा गाठू. एप्रिल 2022 पासून जुलै 2022 पर्यंत भारत 30 ते 35 लाख टन गव्हाची निर्यात करणार आहोत. यंदा 80 लाख टनांपेक्षा अधिक साखरेची निर्यात होण्याची शक्यता आहे. - भारताच्या साखरेला जगभरात मागणी
भारतामध्ये दर वर्षी तीन कोटी टनांहून अधिक साखरेचं उत्पादन केलं जातं. 2020-21 मध्ये भारताने 72 लाख तीस हजार टन साखरेची निर्यात केली होती. सध्या जगभरात उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. बराचसा ऊस हा इथेनॉल निर्मितीसाठी वापरला जातो. त्यामुळे साखरेचे उत्पादन एरव्हीच्या तुलनेत कमी झालं आहे. भारतातदेखील इथेनॉल निर्मितीला सुरुवात झाली आहे; मात्र इतर देशांच्या तुलनेत भारतात इथेनॉल निर्मितीचं प्रमाण कमी आहे. साखर निर्मितीवरच भर दिला जातो. त्यामुळे भारताच्या साखरेला जगभरात मागणी वाढली असून, निर्यातीमध्ये वाढ झाली आहे. - एफएओ फूड प्राइस इंडेक्समध्ये 13% वाढ
फूड अँण्ड ऍग्रीकल्चर ऑर्गनायजेशन अर्थात एफएओकडून प्राप्त माहितीनुसार जगभरात धान्य आणि तेलाच्या किमती वाढल्यामुळे अन्न महागाईमध्ये वाढ झाली आहे. या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की गेल्या महिन्याभरापासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा नकारात्मक परिणाम जगभरातल्या अन्नधान्याच्या बाजारपेठेवर झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात महागाईमध्ये वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. खाद्य तेल आणि अन्नधान्याच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने एफएओ फूड प्राइस इंडेक्समध्ये तब्बल तेरा टक्क्यांची वाढ झाली आहे. - खाद्य तेलाच्या किमतीमध्ये 23 टक्क्यांची वाढ
खाद्य तेलासोबतच कच्चं तेल आणि मौल्यवान धातूंच्या किंमतीमध्येदेखील तेजी आल्याचं पहायला मिळत आहे. रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार मार्चमध्ये अन्न महागाईचा इंडेक्स 159.3 च्या सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे. फेब्रवारी महिन्यात अन्न महागाईचा इंडेक्स 140.7 वर होता. म्हणजेच काय तर, अवघ्या एका महिन्यात अन्न महागाईमध्ये तब्बल 17 टक्क्यांची वाढ झाली आहे. अन्न महागाई वाढण्यासाठी कारणीभूत असलेला मुख्य घटक म्हणजे खाद्यतेलाच्या गगनाला भिडलेल्या किमती. मार्च महिन्यात खाद्य तेलाच्या किमतीमध्ये तब्बल 23 टक्क्यांची वाढ झाली आहे. खाद्यतेल आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचलं आहे. खाद्यतेलासोबतच साखर आणि दूधाचे भाव वाढले आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai