कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी लढणार
- by Aajchi Navi Mumbai
- May 03, 2022
- 1944
अॅड. सुरेश ठाकुर यांची कामगार मेळाव्यात गर्जना
नवी मुंबई ः वाशीतील नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनच्या कार्यालयात मुंबई लेबर युनियनच्या माध्यमातून 1 मे कामगार दिनाचे औचित्य साधून कामगार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला शेकडो कामगारांनी उपस्थिती लावून अनेक मागण्या युनियनकडे केल्या. यावेळी कामगारांच्या प्रश्नांना उत्तर देताना नवी मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असणार्या 6500 कामगारांना कायम करण्यासाठी अंतिम लढा सुरु करण्याची घोषणा ठाकुर यांनी करुन सर्व संघटनांना यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनच्यावतीने वाशी येथे कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मुंबई लेबर युनियनचे कार्याध्यक्ष शंकर साळवी, उरण नगरपालिका युनियनचे संतोष पवार,अॅड. इंगवले, आणि नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अॅड. सुरेश ठाकुर आणि पालिकेतील पाणीपुरवठा, हॉस्पिटल, साफसफाई, स्मशानभूमी विभागातील कामगार उपस्थित होते. यावेळी कामगारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देत मुंबई लेबर युनियनचे कार्याध्यक्ष शंकर साळवी यांनी रोखठोक उत्तरे दिली. यावेळी अॅड सुरेश ठाकुर यांनी मार्गदर्शन करताना नवी मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचा इतिहास सांगत कशापद्धतीने कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले याचे वर्णन केले. देशात समान कामास समान वेतन देणारी ही पहिली महानगरपालिका होती परंतु काही संघटनांच्या भुलथापांना बळी पडून किमान वेतन पदरात पाडून घेतले. आता पुन्हा समान काम समान वेतनाची मागणी करत आहेत हे त्यांच्या संघटनांच्या नेत्यांची अपरिपक्वता असल्याचे कामगारांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी समान काम समान वेतनाबरोबरच कंत्राटी कामगारांना पालिकेत कायम करण्याचा महत्वाचा मुद्दा प्रलंबित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यासाठी आपापले मतभेद बाजुला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. सततचा संघर्ष थांबवायचा असेल आणि खरोखर कामगारांना न्याय द्यायचा असेल तर इथल्या प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय इच्छाशक्ती यांनी एकत्र येऊन कंत्राटी कामगारांना कायम करणे हा एकमेव मार्ग असल्याचे ठाम मत त्यांनी मांडले.
ठाकुर यांच्या या भाषणाचा धागा पकडत मुंबई लेबर युनियनचे कार्याध्यक्ष शंकर साळवी यांनी पाणीपुरवठा विभागातील 70 पंपऑपरेटरना पालिकेत कायम करण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित याचिका सक्षमपणे लढुन सदर कामगारांना पालिकेत कायम करण्याचे आश्वासन दिले. पालिकेच्या 7000 कंत्राटी कामगारांनी साथ दिली तर संपूर्ण कामगारांना कायम करण्यासाठी महाराष्ट्रातील कामगार, वकील, नेत्यांची मदत घेऊन राज्यव्यापी आंदोलन कायदेशीर मार्गाने उभे करण्याचे सुतोवाच केले. मेळावा यशस्वीपणे साजरा करण्यासाठी मुंबई लेबर युनियनचे पदाधिकारी सुजित पाटील, सदानंद प्रभु, नरेंद्र वैराळ, यशवंत काळे, जगदीश म्हात्रे, लाला अम्रुतसागर, वसंत कोळी, जितेंद्र देशमुख, रविंद्र तांडेल, महीला संघटक कौसल्याताई चव्हाण यांनी विशेष मेहनत घेतली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai