सायन्स पार्क गुणवत्ता राखून विहित वेळेत पुर्ण करा
- by Aajchi Navi Mumbai
- May 27, 2022
- 547
जलद कार्यवाहीचे आयुक्तांचे निर्देश
नवी मुंबई ः शहराच्या नावलौकिकात लक्षणीय भर घालणारा सायन्स पार्क हा सेक्टर 19 नेरूळ येथील वंडर्स पार्कमध्ये उभारला जात असून तो पर्यटकांचे विशेष आकर्षण केंद्र ठरणार आहे. सद्यस्थितीत त्याठिकाणी प्लिथं पर्यंतचे काम झाले असून कामाची पाहणी करताना मनुष्यबळात वाढ करुन कामाला अधिक वेग देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.
वंडर्स पार्कमधील मोकळ्या भागात 19500 चौ.मी.च्या बांधकाम क्षेत्रात सायन्स पार्कचा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारला जात आहे. त्याच्या बांधकामाच्या सद्यस्थितीची आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाळी कालावधीत करता येऊ शकतील अशी कामे सुरुच ठेवावीत व नियोजित कालावधीत बांधकाम पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध काम करावे असेही आयुक्तांनी निर्देश दिले. या सायन्स पार्कमध्ये विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान विविध मॉडेल्स, प्रकल्प, थ्रीडी इमेजेस, ऑडिओ-व्हिडिओ अशा विविध माध्यमांतून मांडले जाणार असून याव्दारे विज्ञानाची माहिती आकर्षित करेल अशा पध्दतीने साकारण्यात येणार आहे. याव्दारे शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार असून नागरिकांसाठीही नाविन्यपूर्ण सुविधा मनोरंजक साधनांसह उपलब्ध होणार आहे.
सदर सायन्स पार्कमध्ये काय असणार आहे याचाही आराखडा बांधकाम सुरु असतानाच तयार करून त्या अनुषंगाने कार्यवाही सुरु करावी असे निर्देशित करताना आयुक्तांनी सध्या तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने बदल होत असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर सद्यस्थितीत सर्वात नवीन व आधुनिक असणारे प्रकल्प याठिकाणी नागरिकांना अनुभवता येतील अशा प्रकारे सायन्स पार्क अद्ययावत राहील याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या. सायन्स पार्कमध्ये प्रदर्शित करण्यात येणार्या विविध बाबी, सुविधा, प्रकल्प उपलब्ध करून देताना भारतातील अशा प्रकारच्या सायन्स पार्कचा बारकाईने अभ्यास करावा व इतरत्र कुठेही पहायला मिळणार नाहीत असे आगळेवेगळे प्रकल्प, मॉडेल्स याठिकाणी उपलब्ध असतील अशाप्रकारे जागतिक पातळीवर शोध घ्यावा अशाही सूचना आयुक्तांनी केल्या. हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने अभ्यासपूर्वक अंमलबजावणी करावी अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. काम विहित कालावधीत पूर्ण करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी दिले. कामे गुणात्मकदृष्ट्या उत्तम असणे हे तेथील अभियंत्यांचे मुख्य कर्तव्य असून कामाची गुणवत्ता राखतानाच काम विहीत वेळेत पूर्ण होण्याचीही काळजी घ्यावी असे निर्देश यावेळी अभियांत्रिकी विभागास दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai