Breaking News
पहिल्याच पावसात भिंतीतून पाणी आल्याने रहिवाशी चिंतेत
नवी मुंबई ः राज्यात गुरुवारी संध्याकाळी पावसाने हजेरी लावली. नवी मुंबई शहरातही काही ठिकाणी रिमझिम सरी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. परंतु या मान्सुनपुर्व सरींनी घणसोलीतील सिडकोच्या परवडणार्या घरात मात्र बरसात केली आणि रहिवाशांच्या मनात भविष्यातील भितीचे ढग दाटून आले.
राज्यासह मुंबई व उपनगरात पावसाने हजेरी लावली. नवी मुंबईतही संध्याकाळी दाटून आलेले ढग मोकळे झाले. उन्हामुळे वाहणार्या घामाच्या धारांनी बेजार झालेल्या नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला. मात्र पहिल्याच पावसात घरातल्या भिंतीतून सरी वाहू लागल्याने घणसोलीतील सिडकोच्या नवीन घरातील रहिवाशांचे मात्र टेन्शन वाढले आहे. घणसोली सेक्टर 10 मध्ये सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटक व अल्प उत्पन घटकांसाठी घरे बांधली आहेत. येथील मेघमल्हार या गृहसंकुलात हजारो नागरिकांनी आपल्या आयुष्याची पुंजी खर्च करुन घराचे स्वप्न पुर्ण केले आहे. मात्र या प्रकल्पातील घरांच्या बांधकामाचा दर्जा योग्य नसल्याच्या अनेक तक्रारी सुरुवातीपासून येथील रहिवाशी करत आहेत. त्याचा प्रत्ययेही पहिल्याच पावसात पाहायला मिळाला आहे. पाऊस सुरु झाल्यावर मेघमल्हार सोसायटीमधील ई02 रूम नंबर 1302 मध्ये भिंतीतून पाणी येऊ लागल्याने येथे राहणारे सावंत कुटुंब चिंतेत पडले आहे.
बांधकाम झाल्यानंतर पडलेल्या पहिल्याच पावसात ही अवस्था असून भविष्यात घराचे काय हाल होतील याची भिती त्यांच्यासह संकुलात राहणार्या रहिवाशांना भेडसावू लागली आहे. परवडणार्या घरांच्या नावाखाली जर अशी फसवणुक होत असेल तर आम्ही आयुष्यभराची पुंजी कोणाच्या विश्वासावर खर्च करायची असा सवाल येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस