Breaking News
नवी मुंबई ः महापालिकेच्या महात्मा फुले जंक्शन ते कोपरी जंक्शन पर्यंतच्या बांधण्यात येणार्या उड्डाणपुलाच्या बांधकामात अडथळा ठरणारी 390 झाडे तोडण्याचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव घाईगडबडीत बनवण्यात आल्याचे दिसत असून अनेक कायदेशीर बाबींची पुर्तता या अहवालाच्या सादरीकरणात झाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सदर प्रस्ताव पुन्हा उद्यान विभागाकडे पाठवून पुर्नसादरीकरणाची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
351 कोटी रुपये खर्च करुन नवी मुंबई महापालिकेने महात्मा फुले जंक्शन ते कोपरी जंक्शनपर्यंत उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. या उड्डाणपुलाच्या निर्मितीसाठी पामबीच मार्गावरील रस्ता दुभाजकातील अडथळा ठरणारी 390 झाडे हटविण्यासाठी शहर अभियंता यांच्या मागणीवरुन उद्यान विभागाने वृक्षप्राधिकरणाकडे सदर प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव तुर्भे येथील उद्यान अधिकारी यांनी बनवला असून या झाडांच्या तोडकामाला विरोध होऊ नये म्हणून सुरुवातीला त्याची जाहिरात ठाण्यातील तसेच नवी मुंबईतील स्थानिक वृत्तपत्रामध्ये देण्यात आली होती. त्यासाठी सूचना व हरकती देण्यासाठी नागरिकांना केवळ सात दिवसांचा वेळ देण्यात आला होता. याबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्यावर आयुक्तांनी राज्य स्तरीय वृत्तपत्रात याबाबत स्वतंत्र जाहिरात देऊन त्याची मुदत 20 जूनपर्यंत ठेवली आहे.
याबाबत सूचना व हरकत मांडण्यासठी सदर प्रस्तावाच्या नस्तीचे अवलोकन केेले असता अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामध्ये जवळजवळ सर्वच झाडांचे वय सरासरी 10-12 वर्ष दाखवलेले आहे. वास्तविक पाहता, या रस्त्यावरील झाडे ही 25 ते 30 वर्ष जुनी असताना उद्यान अधिकार्यांनी या झाडांचे वय कोणत्या निकषाच्या आधारे कमी केले याबाबत अनेकांनी विचारणा केली आहे. स्थलांतरीत करण्यात येणारी झाडे ही सानपाडा मलनिस्सारण प्रकल्प, शांतीबाई सुतार उद्यान एमआयडीसी तसेच कोपरणखैरणे सेक्टर 14 येथील निसर्ग उद्यानात पुनर्रोपण करण्यात येणार आहेत. परंतु, या जमिनीचा पोत संबंधित झाडांच्या पुनर्रोपणासाठी पोषक असल्याचा अहवाल सदर नस्तीत नसल्याचे आढळून आले आहे. उद्यान अधिकार्यांनी बनवलेला हा अहवाल उथळ असल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तो बनवून घेण्याची मागणी अनेकांनी केली आहे.
पालिकेच्या उद्यान अधिकार्याने वृक्ष प्राधिकरणास सादर केलेला प्रस्ताव हा नियमानुसार नाही. त्यामध्ये अनेक त्रृटी असून कोणाला तरी झटपट ‘विपूल’ फायदा करून देण्याच्या उद्देशाने हे ‘कदम’ उचलले गेले आहे. या प्रस्तावाच्या अपूर्णतेबाबत पालिका आयुक्त, शहर अभियंता व उपायुक्त उद्यान विभाग यांना अवगत करण्यात आले आहे. त्यांना या क्षेत्रातील तज्ञ संस्थेकडून सविस्तर अहवाल बनवून तो जनतेच्या सूचना व हरकतींसाठी प्रसिध्द करण्यात सांगण्यात आले आहे.- संजयकुमार सुर्वे, सामाजिक कार्यकर्ते
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस