प्रशासकीय भवनाच्या भुखंडावरुन वाद

सिडको-महापालिका वाद चिघळणार

पनवेल ः पालिकेच्या प्रशासकीय भवनासाठी सिडकोने काळसेकर कॉलेजच्या मागील बाजूस धाकटा खांदा गावाजवळ भूखंड दिला आहे. मात्र ही जागा नागरिकांना प्रवासासाठी सोयीची नसल्यामुळे महापालिकेने ही जागा घेण्यास नकार दिला आहे. खांदा कॉलनीजवळील सर्कस मैदानाची जागा द्या, अन्यथा जनआंदोलन उभारू, असा इशारा सत्ताधारी भाजपने दिला आहे. 

साडे तीन चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या पनवेल नगरपालिकेचा विस्तार होऊन 110 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या महापालिकेची स्थापना झाली. उलवे नोड वगळता सिडकोने 30 वर्षांपूर्वी आणि अलीकडच्या काळात विकसित केलेले नोड महापालिकेत समाविष्ट झाले. पनवेल शहरापुरती असणारी नगरपालिका जाऊन अनेक शहरांची मिळून महापालिका झाली. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी महापालिका प्रशासकीय भवन असणार आहे. महापालिकेने भवनासाठी सिडकोकडे भूखंडाची मागणी केली होती. सिडकोने पनवेल शहराजवळील काळसेकर कॉलेजच्या मागे 14 हजार 800 चौरस मीटरचा भूखंड सुचविला आहे. हा भूखंड पुरेसा नसून दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचा नाही. शहराला जोडणारा मुख्य रस्तादेखील जवळपास नाही. महापालिकेने सिडकोचा हा प्रस्ताव नाकारून खांदा कॉलनीजवळील खांदेश्वर रेल्वे स्थानकापासून जवळ असलेला, सर्कस मैदान म्हणून प्रसिद्ध असलेल्या 28 हजार चौरस मीटरच्या भूखंडाची मागणी केली आहे. ही मागणी करूनही सिडकोकडून काही कळविण्यात येत नसल्यामुळे महापालिकेचा आकृतिबंध मंजूर होताच सभागृहनेते परेश ठाकूर यांनी महासभेत सिडकोवर निशाणा साधला. ’सिडको विकसित करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळात पनवेल महापालिकेच्या मालकीची 32 एकर जागा धावपट्टीच्या ठिकाणी गेली आहे. ही सिडकोला देताना आम्ही पनवेलकर म्हणून कोणतीही अडचण आणली नाही. आता महापालिकेच्या प्रशासकीय भवनाला जागा देताना सिडको महापालिकेशी एखाद्या विकासकासारखे वागते आहे. आम्ही सुचविलेला भूखंड भविष्यात नागरिकांना सोयीस्कर पडणार आहे. सिडको नागरिकांच्या सोयीचा विचार करीत असेल तर आम्हाला हाच भूखंड पाहिजे. सिडकोने नकार दिल्यास आम्ही सिडकोच्या विरोधात पनवेलकरांचे जनआंदोलन उभे करू,’ असा इशारा त्यांनी दिला. सिडकोने मागील 30 वर्षांत शहरे विकसित केली मात्र बाजारतळ, पार्किंग विकसित केले नाहीत. शहरांना होल्डिंग पॉण्ड्स दिले नाहीत. आता महापालिका झाली तर असहकार्य करीत आहेत. त्यामुळे आम्हाला ही भूमिका घ्यावी लागणार आहे, असे ठाकूर म्हणाले.