Breaking News
शिवछाया गणेशोत्सव मंडळातर्फे 23 शिक्षकांचा गौरव
नवी मुंबई ः शिक्षक दिनाचे औचित्य साधून तुर्भे येथील शिवछाया मित्र मंडळाने नवी मुंबईतल्या 23 शिक्षकांचा आदर्श पुरस्कार देऊन सत्कार केला. त्यामध्ये करावे गावातील भुमिपुत्र असलेले ‘ज्ञानदीप सेवा मंडळ’ शाळेतील प्राथमिक विभागातील शिक्षक हरेश तांडेल यांचा समावेश झाल्याने शाळा प्रशासन व विद्यार्थांंकडून त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.
हरेश तांडले हे गेली 23 वर्षे ज्ञानदीप सेवा मंडळाची प्राथमिक शाळा करावे येथे ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. त्यांच्या शैक्षणिक सेवेत आतापर्यंत अनेक विद्यार्थी घडले आहेत. अध्यापनासह इतर उपक्रमातही त्यांचा सहभाग असतो. हार्मोनियम वादन व अभंगवाणी गायन कार्यक्रम ते करतात. शाळेतील वार्षिक क्रिडा स्पर्धा असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, चर्चासत्र असो प्रत्येक उपक्रमात हे सहभागी होऊन विद्यार्थांना प्रोत्साहन देत असतात. सूत्रसंचालन करण्याची त्यांची कला सर्वांनाच आकर्षुण घेते. इंग्रजी आणि इतिहास या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे.
इंग्रजी विषय ते अगदी सोप्या भाषेत शिकवत असल्याने या विषयाची भिती मुलांच्या मनातून काढून त्यात गोडी निर्माण झाल्याने मराठी माध्यमाची मुले अस्खलित इंग्रजी संभाषण करण्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली सक्षम होत आहेत. त्याचबरोबर शाळेतील बहुतांश विद्यार्थी अल्प उत्पन्न गटातील असल्याने त्यांना विविध मार्गाने मदत मिळवून देण्यासाठी ते अखंडित कार्य करत आहेत. तसेच काव्यलेखनाची आवड असून त्यांच्या कविता प्रकाशित होण्याच्या मार्गवर आहेत. विशेष म्हणजे शिक्षक दिनानिमित्त नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षकांच्या गायन स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून त्यांची उपस्थिती होती. ते ज्ञानदानाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे कार्य करत असल्याने शिवछाया मित्र मंडळाच्यावतीने आदर्श शिक्षक म्हणून हरेश तांडेल यांना गौरविण्यात आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस