अटल ‘रत्न’ काळाच्या पडद्याआड

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. 

अटल बिहारी वाजपेयी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अटल बिहारी वाजपेयी प्रकृती खालावल्यामुळे गेले नऊ आठवडे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होते. गुरुवारी संध्याकाळी 5.5 मिनिटांनी त्यांचं निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले आहे. वाजपेयी हे 93 वर्षांचे होते. निधनामुळे भारतीय राजकारणाचा दृढनिश्यची आणि संयमी चेहरा हरपला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री सकाळपासून उपस्थित होते. 

अटल बिहारी वाजपेयी यांना डिमेंशिया नावाच्या आजाराने ग्रासले होते. 2009 पासून ते व्हिलचेअरवर होते. 11 जूनला किडनीच्या संसर्गामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत गेली. अटलबिहारी वाजपेयी यांनी 1996, 1998 आणि 1999 या काळात भारताचे पंतप्रधानपद भुषविले. 2015 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.  अटल बिहारी वाजपेयी  यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 ला झाला. अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य असून ते भाजपचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. अटल बिहारी वाजपेयी भारताचे 10 वे पंतप्रधान होते.  1996 साली पहिल्यांदा भाजपाने अन्य पक्षांच्या साथीने केंद्रात सरकार बनवले. वाजपेयींचा पंतप्रधानपदाचा पहिला कार्यकाळ फक्त 13 दिवसांचा होता. 1998 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर वाजपेयी दुसर्‍यांदा पंतप्रधान झाले.  भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना झाली. जे सरकार 13 महिने हे चालले. जयललिता यांच्या पक्षाने पाठिंबा काढल्यामुळे 17 एप्रिल 1999 रोजी अवघ्या एका मताने वाजपेयी  सरकार कोसळले. त्यानंतर पुन्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले.

वाजपेयी यांनी छोट्या पक्षांना एकत्र घेऊन पाच वर्षे सरकार चालविले.  यावेळी एनडीएचा प्रयोग यशस्वी झाला आणि वाजपेयींनी 1999 ते 2004 असा पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरले. अटल बिहारी वाजपेयी तब्बल दहावेळा लोकसभेवर आणि दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले.  2009 पर्यंत ते उत्तर प्रदेश लखनऊमधून निवडून लोकसभेवर गेले. मोरारजी देसाई यांच्या जनता सरकारमध्ये अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री होते. जनता पक्षाचे आघाडी सरकार कोसळल्यानंतर वाजपेयींनी 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना केली. 25 डिसेंबर 2014 रोजी वाजपेयींच्या जन्मदिनी भारताच्या राष्ट्रपतींनी वाजपेयींना भारत रत्न पुरस्काराची घोषणा केली. भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. 27 मार्च 2015 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी वाजपेयींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.