Breaking News
2022-23 मधील कामांना निधी वितरीत करण्याचा शासन निर्णय
नवी मुंबई ः पर्यटनाला चालना देण्यासाठी अॅडव्हेंचर टुरिझमचं धोरण महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणल होते. शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यावर पर्यटन विभागाच्या 59 हजार 610 कोटींच्या विकासकामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सन 2021-22 या वर्षांमध्ये प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांवरील स्थगिती उठविली असून 2022-23 या वर्षामध्ये प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांवरील स्थगिती उठवून निधी वितरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे आता नवी मुंबईतील रखडलेल्या पर्यटन विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोरोना महामारीनंतर हळूहळू पर्यटनाला चालना मिळू लागली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने अॅडव्हेंचर टुरिझमचं धोरण, कॅरव्हॅन धोरण आणि साहसी पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांची घोषणा करण्यात आली. ज्यामुळे अर्थव्यवस्थेला गती येऊन रोजगारही उपलब्ध होतो. अशात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी पर्यटन विभागाच्या 59 हजार 610 कोटींच्या विकासकामांना स्थगिती दिली होती. यामध्ये नवी मुंबईतील गवळीदेवी, सुलाईदेवी या पर्यटन स्थळांचाही समावेश होता. पर्यावरण समृध्द नवी मुंबईच्या लौकिकात भर घालण्यासाठी गवळी देव आणि सुलाई देवी या स्थानिक धार्मिक पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने 5 कोटीं रुपये अंदाजित खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्याला 31 जानेवारी 2022 रोजी शासन निर्णयानुसार मंजुरी देवून 150 कोटींचा निधी कार्यान्वयीन यंत्रणा असलेल्या शहर अभियंता विभाग नवी मुंबई पालिका यांना वितरीत करण्यास परवानगी देण्यात आली होती.
मात्र या शिंदे-फडणवीस सरकारने राज्यभरातील पर्यटन विभागाच्या विकासकामांना स्थगिती देण्याचा निर्णय जुलै 2022 मध्ये घेतला होता. त्यामुळे अनेक पर्यटन स्थळांचा विकास रखडला होता. आता त्या कामांवरील स्थगिती उठवण्यात आली आहे. 2021-22 या वर्षांमध्ये प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांवरील स्थगिती उठविली असून 2022-23 या वर्षामध्ये प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांवरील स्थगिती उठवून निधी वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून 2 नोव्हेंबर रोजी त्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे आता राज्यातील रखडलेल्या विकास कामांना चालना मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ऐरोलीतील गवळी देवी व सुलाई देवी येथील पर्यटन स्थळ विकसीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस