डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋण न फिटणारे
- by Aajchi Navi Mumbai
- Dec 06, 2022
- 646
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.भालचंद्र मुणगेकर यांचा श्रोत्यांशी संवाद
नवी मुंबई ः स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या चार तत्वांवर आधारित आधुनिक भारत उभा करण्याची संकल्पना बाबासाहेबांच्या नजरेसमोर होती. त्यातूनच राज्यघटना आकारास आली. बाबासाहेबांचे हे ऋण आपण आजन्म मानले पाहिजेत व त्यांच्या विचारांचा आदर्श कायम नजरेसमोर ठेवून प्रवास केला पाहिजे, त्यातूनच एकात्म विचारांचा आधुनिक भारत उभा राहील असा विश्वास ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ‘आधुनिक भारताची संकल्पना’ या विषयावर डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात मोठ्या संख्येने उपस्थित श्रोत्यांशी संवाद साधला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशाला पडलेले सुंदर स्वप्न असून परदेशातील कोलंबिया विद्यापीठाने त्यांच्या 450 वर्षाच्या इतिहासातील सर्वात विव्दान विद्यार्थी असा बाबासाहेबांचा गौरव केलेला आहे. प्रचंड अभ्यासू व विचारवंत असणारा व्यक्ती प्रत्यक्ष असू शकतो यावर विश्वास बसू नये इतके बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व अलौकिक होते अशा शब्दात डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाचा गौरव केला. बाबासाहेबांच्या जीवनातील काही कटु प्रसंग सांगताना ते काही काळ भावनाविवश झाले आणि त्यांचा कंठ दाटून आला. दुसर्याचा हक्क नाकारणे, दुसर्याचे हिरावून घेणे म्हणजे अन्याय हे सांगत न्याय हे जगण्याचे साधन आहे अशी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली भूमिका डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मांडली. नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे पुतळाविरहित स्मारक खरे तर बाबासाहेबांच्या विचारांचे स्मारक असून अभूतपूर्व असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. स्मारकातील भव्यता, स्वच्छता, ग्रंथसमृध्दी, ग्रंथ रचनेची आकर्षक पध्दती, छायाचित्र संग्रहालयाव्दारे मांडलेला बाबासाहेबांचा जीवनप्रवास सारे काही लक्षणीय असल्याचे सांगत प्रत्येक नागरिकाने आवर्जून भेट द्यावी असे हे स्मारक असल्याचे डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितले.
याप्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ‘ज्ञान हीच शक्ती’ या बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारसंपदेवर आधारित उभारलेल्या या स्मारकाची ओळख ‘ज्ञानस्मारक’ व्हावी ही महानगरपालिकेची भूमिका असल्याचे स्पष्ट केले. त्यादृष्टीने येथील ग्रंथालय समृध्द करण्याकडे व तेथे ऑडिओ व्हिज्युअल साधनांव्दारे ई-लायब्ररी अधिक विकसित करून नव्या पिढीला बाबासाहेबांच्या विचारांकडे घेऊन जाण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले.
- विशेष सन्मान
याप्रसंगी नुकताच महामहीम राष्ट्रपती महोदया यांच्या शुभहस्ते साहसी जलतरण क्षेत्रातील मानाचा तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार’ प्राप्त नवी मुंबईचा साहसी जलतरणपट्टू तसेच स्वच्छ नवी मुंबई मिशनचा स्वच्छता प्रसारक युथ आयकॉन श्री. शुभम वनमाळी याचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे पुस्तकविक्रीचे नवे विक्रम प्रस्थापित करणार्या ‘गोष्ट पैशापाण्याची’ या पुस्तकाचे लेखक आणि ‘लेट्स रीड इंडिया’ संस्थेच्या माध्यमातून व्यापक वाचक चळवळ राबविणारे संस्थाप्रमुख प्रफुल्ल वानखेडे याना विक्रमी ग्रंथरचनेबद्दल विशेष सन्मानित करण्यात आले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai