Breaking News
50 टक्के रक्कम तात्काळ वितरीत करण्याचे शासनाचे आदेश
नवी मुंबई ः माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्पर्धेत अमृत गटात नवी मुंबई महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. प्रथम पुरस्काराची 10 कोटी रुपयांची रक्कम नवी मुंबई महापालिकेला प्रदान केली जाणार आहे. यातील 50 टक्के रक्कम पालिकेला वितरीत करण्याचे आदेश शासनाने महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाला दिले आहेत. 50 टक्के रक्कम उर्वरित सविस्तर प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर वितरीत करण्यात येणार आहे.
शासनाने एप्रि 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत राबविलेल्या माझी वसुंधरा अभियानात राज्यातील 406 स्थानिक स्वराज्य संस्थांनी सहभाग घेतला होता. यावर्षी ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे ध्येय नजरेसमोर ठेवून पालिका अभियानास सामोरी गेली आणि राज्यातील सर्वोत्तम पर्यावरणपूरक शहराची मानकरी ठरली. या स्पर्धेत अमृत गटात नवी मुंबई महापालिकेचा राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. नवी मुंबई पालिकेतर्फे पर्यावरणशील शहर निर्मितीकरिता वृक्षारोपणाप्रमाणेच वृक्षसंवर्धनाकडेही विशेष लक्ष दिले. मागील दोन वर्षांत दोन लाखांहून अधिक वृक्षरोपे लावण्यात आली. कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानामध्ये मियावाकी पद्धतीने केलेल्या शहरी जंगल निर्मितीप्रमाणेच या वर्षी सेक्टर 28 नेरूळ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथेही मियावाकी पद्धतीने एक लाख 23 हजार देशी प्रजातीच्या वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. रस्त्याच्या कडेला 24 हरित क्षेत्रे विकसित करण्यात आली असून व्हर्टिकल गार्डन ही संकल्पना ठिकठिकाणी राबवण्यात आलेली आहे. उल्लेखनीय म्हणजे पालिकेने स्वत:ची रोपवाटिका निर्माण केली आहे.
राज्यात प्रथम क्रमांकाचा बहुमान पटकावल्याने महापालिकेस दहा कोटींचे बक्षीस जाहीर झाले आहे. या रक्कमेतील 50 टक्के हिस्सा महाराष्ट्र प्रदुषण मंडळातर्फे तात्काळ वितरीत करण्याचे आदेश शासनाने 5 डिसेंबर रोजी काढले आहेत. या रक्कमेतून निसर्गाच्या पंचतत्त्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाययोजना हाती घेण्यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करायचा आहे. हा अहवाल बनविताना यातील 50 टक्के रक्कम हि हरित क्षेत्र वाढविण्यासाठी व 50 टक्के रक्कम इतर पर्यावरण पुरक उपाय योजनांसाठी वापरायची आहे. यातूनच नदी, तळे व नाल्यांचे पुनर्जीवन, सौंदर्यीकरण, विद्युत वाहनांना प्रोत्साहन यासारखे उपक्रम राबवून 10 टक्के रक्कम अभियान काळात राबविलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस दिले जाणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस