Breaking News
कूठे प्लास्टिक कचरा, बाटल्या, खडी तर कूठे लोखंडी पोलांची रीघ
नवी मुंबई ः तुर्भे स्टोअर परिसरातील अण्णाभाऊ साठे मैदानाची दुरावस्था झाली आहे. मैदानात लोखंडी पोल टाकले असून कचर्याचे साम्राज्य पसरले आहे. गेट देखील तुटलेला आहे. परिणामी अपघात घडण्याची शक्यता आहे तसेच मुलांना खेळण्यास अडथळे निर्माण होत आहेत. पालिकेच्या दुर्लक्षामुळे गेल्या वर्षभरापासून या मैदानाला अवकळा आली आहे. त्यामुळे या मैदानाच्या डागडुजी व सुशोभिकरण करण्याची मागणी खेळाडू व नागरीकांनी केली आहे.
स्वच्छ नवी मुंबईत मैदानांची कमी असून असलेल्या मैदानांना बकालपणा आला आहे. त्यातीलच तुर्भे परिसरातील अण्णाभाऊ साठे मैदानाची दुरावस्था झाली असून तेथे सोयी सुविधांचा अभाव आहे. परिसरातील खेळांडुसाठी हे एकमेव मैदान असून क्रिकेटप्रेमींना याच मैदानाचा आधार आहे. परंतु मैदानाची अवस्था बिकट असल्याने खेळाडुंचा हिरमोड होत आहे. खेळाच्या मैदानात बांधकाम व लोखंडी पोल, इतर साहित्य टाकल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मैदानाला अस्वच्छतेचे ग्रहण लागले आहे. प्लास्टिक कचरा, बाटल्या, खडी, पालापाचोळा इतरत्र पसरले आहेत. परिसरातील मुले याठिकाणी खेळण्यासाठी येतात. नागरिक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. मात्र त्यांना बसण्यासाठी बाक अस्तित्वात नाहीत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. दिवे नाहीत, चालण्यासाठी पदपथ उपलब्ध नाहीत. परिणामी मैदानाला बकालस्वरुप प्राप्त झाल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस