रस्त्यावरील मुलांच्या प्रगतीसाठी ‘फिरते पथक’
- by मोना माळी-सणस
- Dec 24, 2022
- 624
राज्याच्या महिला व बालविकास विभागाचा प्रकल्प
नवी मुंबई ः रस्त्यावर राहणार्या मुलांची काळजी व संरक्षणासाठी तसेच त्यांना शिक्षणाच्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फिरते पथक हा एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत नाविन्यपुर्ण उपक्रम राज्याच्या महिला व बालविकास विभागाने घेतला आहे. सुरुवातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, पुणे आणि नागपुर या सहा जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
हा प्रकल्प एकात्मिक बाल संरक्षण योजनेंतर्गत केंद्र सरकारला सादर करण्यात आला होता. या प्रकल्पाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली असून 50 लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. तसेच या व्यतिरिक्त लागणारा खर्च बाल निधीतून करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे. प्रत्येक मुलाला त्याच्या वयोगटाप्रमाणे आहार व इतर शैक्षणिक मदत मिळवून देण्यासाठी हे पथक काम करेल. या बालकांना नियमित अंगणवाडीत किंवा शाळेत पाठविण्यासाठी त्यांच्या पालकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. हे फिरते पथक सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळात शहरातील गर्दीच्या ठिकाणी, रस्त्यावरील मुलांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी फिरेल.
मार्गदर्शक सूचना
- जिल्ह्यामध्ये एक बाल स्नेही बस किंवा व्हॅन असेल. या वाहनाची क्षमता 25 मुलांची असेल.
- जिल्ह्यात रस्त्यावर राहणार्या मुलांसोबत काम करणार्या एका स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येईल.
- वाहनात सीसीटीव्ही कॅमेरा तसेच ट्रॅकिंग सिस्टिम असेल.
- फिरते पथक प्रकल्पातील चार कर्मचार्यांपैकी किमान दोन कर्मचारी महिला असाव्यात.
- मुलांना जवळच्या शासकीय शाळेत दाखल करण्याचे प्रयत्न करावेत.
- मुलांना आहार व शिक्षण या व्यतिरिक्त इतर गरज आढळून आल्यास संबंधित शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत.
- उपक्रम राबविताना सर्वप्रथम मुलांच्या पालकांना विश्वासात घ्यावे.
- बसची वेळ सकाळी 9 ते सायं 6 अशी असणार आहे.
- बालकांना खेळ, शैक्षणिक साहित्य, गाणी, चित्रकला, नृत्य गोष्टी याद्वारे अभ्यासाची गोडी लावावी. कालांतराने पालकांनी त्यांच्या बालकाला नियमीत अंगणवाडी, शाळेत पाठविण्यासाठी प्रोत्साहित करावे लागणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस