कोकण शिक्षक मतदारसंघाच्या अंतिम यादीत 37 हजार 719 मतदार
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 04, 2023
- 596
नवी मुंबई : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाली असून, कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये एकूण 37 हजार 719 मतदार आहेत. तसेच या निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, याचा भंग होणार नाही याबाबत विशेष नियोजन करण्यात आले असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली.
मंगळवारी कोकण भवनातील समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारत निवडणूक आयोगाकडून 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत कोकण शिक्षक मतदारसंघासाठी नव्याने याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. या घोषित कार्यक्रमानुसार कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. या यादीनुसार कोकण विभागात एकूण 30 हजार 162 मतदार असून त्यापैकी 16 हजार 82 स्त्री मतदार असून 14 हजार 80 पुरुष मतदार होते. या मतदार याद्यांवर 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत प्राप्त झालेले दावे व हरकती निर्णीत करुन कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी 30 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आली. या अंतिम यादीनूसार कोकण विभागात एकूण 37 हजार 719 मतदार असून त्यापैकी 18 हजार 97 स्त्री मतदार आहेत तर 19 हजार 622 पुरुष मतदार आहेत.
अंतिम यादी जाहीर झाल्या नंतर भारत निवडणूक आयोगाने 29 डिसेंबर 2022 च्या परिपत्रकान्वये कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्याच दिवसापासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या जाहीर करण्यात आलेल्या कार्यमक्रमानूसार 5 जानेवारी 2023 रोजी निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येईल आणि 12 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक असेल. 13 जानेवारी रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येईल. तर 16 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक असेल. 30 जानेवारी रोजी मतदान होईल. मतदानाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 अशी असेल. 2 फेब्रूवारी रोजी मतमोजणी केली जाईल आणि 4 फेब्रूवारी रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. आचारसहिंतेबाबत माहिती देताना आयुक्त डॉ. कल्याणकर म्हणाले की, कोकण विभागात जिल्हास्तरावर आचारसंहिता स्थायी समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीत जिल्हाधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. जिल्हास्तरावर तक्रार निवारण कक्ष, माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समिती व भरारी पथक स्थापन करण्यात येत आहेत. तालुकास्तरावर व्हिडीओग्राफी पथक तयार करण्यात येत असून, या पथकांमार्फत राजकीय पक्ष,लोक प्रतिनिधी यांच्या दौऱ्यादरम्यान आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत पर्यवेक्षण करण्यात येईल. विभागीयस्तरावर चोवीस तास चालू असलेला तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचे त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai