पुनर्वसनसंदर्भातील तक्रारी निवारणासाठी विशेष समिती

नवी मुंबई : पनवेल, उरण तालुक्यातील जी गावे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे बाधित झालेली आहेत त्या प्रकल्पग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची ग्वाही, सिडको प्रशासनाच्या वतीने लोकप्रतिनिधी आणि प्रकल्पग्रस्त व पुनर्वसबाधित दहा गाव समन्वय समितीला देण्यात आली. तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे स्थलांतरित होणार्‍या 10 गावातील ग्रामस्थांच्या पुनर्वसनासंदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी सिडकोने विशेष समिती गठीत केली आहे. 

पूर्वीच्या तक्रार निवारण समितीने अमान्य केलेल्या प्रकल्पग्रस्त बांधकामधारकांच्या 186 तक्रारींचे पुनर्विलोकन करण्याची जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली आहे. दरम्यान, या समितीची पहिली बैठक शनिवारी सिडको भवनमध्ये पार पडली. या बैठकीत पूर्वीच्या तक्रार निवारण समितीने अमान्य केलेल्या वाघिवली गावातील बांधकाम धारकांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी बांधकामधारकांसह सिडको अधिकार्‍यांनी त्यांची बाजू मांडली. सदर समितीची पुढील बैठक 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. विमानतळ प्रकल्पामुळे स्थलांतरित होणार्‍या 10 गावातील ग्रामस्थांना राज्य शासनाने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार पुनर्वसन पॅकेज दिले जात आहे. विशेष म्हणजे, प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार या पुर्नवसन पॅकेजमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आली. त्यानुसार या पुर्नवसनाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मात्र त्यानंतर 10 गावातील अनेक बांधकामधारकांच्या तक्रारी येत होत्या. या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी अपर जिल्हाधिकारी तथा सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक एस.एस.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती गठीत केली होती. या समितीने प्राप्त झालेल्या 360 तक्रारी वर्ग करून गावनिहाय सुनावणी करून अहवाल तयार केला होता. त्यापैकी 186 तक्रारी अमान्य करण्याची शिफारस समितीने केली होती. तसे संबंधितांना कळविण्यात आले होते. परंतु गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत अमान्य केलेल्या प्रकरणांचे पुनर्विलोकन करण्याची विनंती 10 गाव संघर्ष समितीने केली होती. व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सदर प्रकरणांची पुर्नतपासणी करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार भारतीय प्रशासनातील निवृत्त असलेले अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली आहे. 

या समितीत आ.प्रशांत ठाकूर, आ.मनोहर भोईर, माजी आ. विवेक पाटील, प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष नाथा पाटील, सचिव बाळकृष्ण झुगे, सल्लागार आर.सी.घरत, कामगार नेते महेंद्र घरत व मनोज जालनावाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.