कोपरखैरणे पालिका शाळेत वाढीव वर्गखोल्या

नवी मुंबई ः शिक्षण व्हिजनची योग्य अंमलबजावणी करीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांतून गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जात आहे. इतरांच्या तुलनेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची पटसंख्या वाढत असून यावर्षीही पटसंख्येत 1 हजारहून अधिक विद्यार्थ्यांची वाढ झाल्याचे अभिमानाने सांगत त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळा इमारतीत वर्गखोल्या वाढवाव्या लागत आहेत याचे समाधान वाटते अशा शब्दात नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी मनोगत व्यक्त केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर 7, कोपरखैरणे येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 32 व 114 इमारतीच्या दुसर्‍या मजल्याच्या वाढीव बांधकामाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रंसगी ऐरोली विधानसभा सदस्य आमदार संदीप नाईक, परिवहन समिती सभापती रामचंद्र दळवी, इ प्रभाग समितीच्या अध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधून आधुनिक शिक्षणपध्दतीचा अंगिकार केला जात असून अनेक गोष्टींतील पहिल्या नंबरप्रमाणे डिजीटल स्कुल संकल्पना राबविणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका असल्याचा आनंद आणि अभिमान वाटतो अशा शब्दात ऐरोली विधानसभा सदस्य आमदार संदीप नाईक यांनी भावना व्यक्त केल्या. सेक्टर 7, कोपरखैरणे येथील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 32 व 114 इमारतीमध्ये वाढीव वर्गखोल्यांची गरज लक्षात घेऊन 1 कोटी 64 लक्ष रक्कम खर्च करून 754.90 चौ.मी. चे दुसर्‍या मजल्याचे वाढीव बांधकाम करण्यात आले असून यामध्ये 8 वर्गखोल्या, भांडार कक्ष, मुख्याध्यापक कक्ष, शिक्षक कक्ष, प्रयोगशाळा, कृतीकक्ष व बहुउद्देशीय वर्ग अशी सुविधा 6 प्रसाधनगृहांसह उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामधील सर्वच वर्गखोल्या प्रशस्त व प्रकाशमान आणि हवेशीर असल्याने मुलांना व शिक्षकांना अभ्यासासाठी उत्साहवर्धक वातावरण उपलब्ध होणार आहे.